
दारूतून पाजले गुंगीचे औषध; गोव्यात सलून चालवणाऱ्या महाराष्ट्रातील 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू
महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील २६ वर्षीय तरुणीचा गोव्यात मृत्यू झाला आहे. दारूतून गुंगीचे औषध पाजल्याने तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ती गोव्यात सलूनचा व्यवसाय करत होती.
याप्रकरणी मूळच्या उत्तर प्रदेशातील व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. १९ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली.
मृत तरुणीच्या लहान भावाने याप्रकरणी कळंगुट पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहीता कलम १२३ आणि १०६ (१) अंतर्गत रिझवान हुसेन (रा. कांदोळी, मूळ उत्तर प्रदेश) याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जानेवारी २०२५ मध्ये तिने पर्वरीत स्वत:चे सलून सुरु केले होते.
मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, तरुणी तीन वर्षापासून संशयित रिझवानच्या मालकीच्या कळंगुट येथील सलूनमध्ये काम करत होती. तिने तेथील काम सोडून स्वत:च्या मालकीचे सलून पर्वरीत सुरु केले होते. १९ ऑक्टोबर रोजी तरुणीने आईला दुपारी फोन केला होता, त्यानंतर तिचा फोन बंद लागत होता.
दरम्यान, संशयित रिझवानने रात्री साडेनऊच्या सुमारास तरुणीच्या आईला फोन करुन ती आजारी असल्याची माहिती दिली. त्यानंतर दहाच मिनिटांनी त्याने पुन्हा फोन करुन तरुणीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. कळंगुट पोलिसांनी देखील तरुणीच्या भावाला मृत्यूची माहिती दिली.मृत तरुणीच्या भावाने संशयित रिझवान हुसेन याने बहिणीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा संशय व्यक्त केला आहे. संशयिताने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय देखील फिर्यादीने व्यक्त केला आहे.



