कोकणवासीयांसाठी मोठी बातमी! दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय!

Ratnagiri News : कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. कोकण रेल्वेमार्गावर चिपळूण आणि रत्नागिरीसाठी स्वतंत्र रेल्वे सोडण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून सुरू होती.

करोनाच्या काळात बंद झालेली दादर-दिवा पॅसेंजर पुन्हा सुरू करावी, अशी मागणीही होती. रेल्वे प्रशासनाने १५ ऑगस्टपासून गणेशोत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन मेमू रेल्वे सुरू केली होती आणि ती दिवाळीपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून मध्य रेल्वेने ही गाडी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

दिवा ते चिपळूण मेमू लोकल सकाळी ७.१५ वाजता दिवा रेल्वेस्थानकातून चिपळूणसाठी धावेल, तर परतीची मेमू लोकल दुपारी १२ वाजता चिपळूण रेल्वेस्थानकातून दिव्यासाठी रवाना होईल. दोन्ही गाड्या सहा ते सात तासात निश्चित ठिकाणी पोहोचतील. त्यामुळे एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांवरील ताण कमी होणार आहे.

चिपळूण, खेड, रोहा, माणगाव, गोरेगाव, वीर, कोलाड, इंदापूर, पेण, पनवेल अशा २६ स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. कोकण रेल्वेमार्गावर दररोज २४ तासांत २६ प्रवासी एक्स्प्रेस गाड्या धावतात. या गाड्यांपैकी ज्या गाड्यांना चिपळूण रेल्वेस्थानकावर थांबा आहे, त्यांना एक किंवा दोन जनरल डबे जोडलेले असतात. हे डबे रत्नागिरी, गोवा, कर्नाटक आणि केरळ येथून भरून येतात, ज्यामुळे चिपळूणपासून पुढच्या प्रवाशांना उभे राहावे लागते. अनेकदा आरक्षित डब्यांत अतिक्रमण करावे लागते.

दापोली, मंडणगड, गुहागर तालुक्याला थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही. संगमेश्वर व खेड येथे रेल्वेस्थानक असूनही एक्स्प्रेस गाड्यांना थांबे नाहीत. त्यामुळे येथील प्रवासी चिपळूणला येऊन प्रवास करतात. खेड तालुक्यातील १५ गावांचा परिसर, चिपळूणच्या पूर्व विभागातील तसेच सावर्डे परिसरातील लोकसुद्धा रेल्वेने प्रवास करण्यासाठी चिपळूणला येतात. अशा सामान्य प्रवाशांसाठी मेमू गाडी उपयुक्त ठरणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतल्याने २५ वर्षांनंतर चिपळूणसाठी स्वतंत्र गाडी मिळाल्यामुळे कोकणातील हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button