
महाड येथे ३ नोव्हेंबर रोजी रिपब्लिकन (आठवले) पक्षाचा ६८ वा वर्धापन दिन सोहळा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच सामाजिक न्याय राज्य मंत्री (भारत सरकार) रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या ६८ वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता चांदे क्रीडा मैदान, महाड क्रांतीभूमी, चवदार तळे, (ता. महाड, जि. रायगड) येथे हा कार्यक्रम होईल. हा सोहळा राजाभाऊ सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या वेळी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.
रिपब्लिकन पक्षाचा ६८ वा वर्धापन दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी मुंबई प्रदेशच्या वतीने सर्व जिल्हा, तालुका, वार्ड मधील पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागात वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी बैठकीचे आयोजन करून सर्वांना संबोधित करावे तसेच सर्व आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी चांदे क्रीडा मैदान, महाड क्रांतीभूमी, चवदार तळे येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक गोविंदराव पवार, मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, मुंबई प्रदेश कोषाध्यक्ष सुनील मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.




