
चैतन्य, उत्साह, आनंदात नरेंद्रचार्यजी यांचा जन्मोत्सव
साधुसंत, लाखो अनुयायांकडून औक्षण; मान्यवरांच्या शुभेच्छा
नाणीज : श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे २२ ऑक्टोबर रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचा जन्मोत्सव सोहळा आनंद, उत्साह व चैतन्यमयी वातावरणात साजरा झाला. रात्री देशभरातून आलेल्या विविध आखाड्याच्या साधुसंतांनी व महाराजांच्या कुटुंबीयांनी औक्षण केले. लाखो भाविकांनी आनंदाचे डोही आनंद तरंग असा अनुभव घेतला.
मंगळवारी दिवसभर अवघा सुंदरगड भाविकांनी फुलून गेला. दरम्यान, पर्यावरण जागृतीचा संदेश देत निघालेल्या तीन वसुंधरा दिंड्यांचे सुंदरगडावर प्रचंड उत्साहात आगमन झाले. महाराष्ट्रभर या उपक्रमाचे मोठे कौतुक झाले.
सुंदरगडावर दिवाळी पहाटचा कार्यक्रम झाला. त्यासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे पहाटे पाच वाजता सुंदरगडावरील संतपीठावरआगमन झाले. त्यांच्यासमवेत सौ. सुप्रियाताई, प.पू. कानिफनाथ महाराज, सौ. ओमेश्वरीताई, देवयोगी असे सारे कुटुंबिय होते. यावेळी भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले. नरेंद्राचार्यजी महाराजांच्या समवेत सर्वांनी एकत्र दिवाळीचा फराळ केला. भाविकांसाठी दिवाळी व जन्मोत्सव एकत्र आल्याने दुधात साखर असे वातावरण होते.
या सोहळ्यासाठी अनेक नेत्यांची, शासकीय अधिका-यांची आवर्जून उपस्थिती होती. त्यांनी नरेंद्राचार्यजींचे पुष्पहार घालून अभिष्टचिंतन केले आणि आशीर्वाद घेतले. वाढदिनी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम, माजी आमदार बाळ माने, माजी आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, परशुराम कदम, महेश म्हाप आदींनी नरेंद्राचार्यजी महाराजांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री उदय सामंत यांनी नरेंद्राचार्यजींच्या वृक्षलागवड, देहदान, रक्तदान या सामाजिक कार्याचा गौरवाने उल्लेख केला.
दुपारी तीन वाजता सामुदाईक लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम झाला वे.शा. सं. भालचंद्रशास्त्री शौचेगुरूजी यांनी विधीवत पूजा सांगितली. सकाळी नैमित्तिक पूजाविधी व मंत्रघोषाने सोहळा सुरू झाला. मंगळवारी सुरू झालेल्या सप्तचिरंजीव महामृत्यूंजय यागाची बुधवारी समाप्ती झाली. त्यानंतर प्रवचनकार पदवीदान समारंभ झाला.
सकाळी जन्मोत्सवाचे औचित्य साधून सात उपपिठांवरून निघालेल्या व पर्यावरण जागृती करणाऱ्या सात वसुंधरा दिंड्यापैकी तीन दिंड्यांचे नाणीजक्षेत्री त्या दिवशी आगमन झाले. सर्वप्रथम सकाळी दहा वाजता तेलंगणा दिंडी आली. त्यानंतर नाशिक व दुपारी पुणे दिंडीचे आगमन झाले. दिंड्यांच्या स्वागतासाठी पीठाचे उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज स्वतः उपस्थित होते.
दिवसभराच्या विविध कार्यक्रमांनंतर रात्री प्रथम प.पू. कानिफनाथ महाराज यांचे प्रवचन झाले. साडेआठला परमवंदनीय जगद्गुरू नरेंद्राचार्यजी यांचे अमृतमय प्रवचन झाले. यामध्ये त्यांनी अध्यात्म व विज्ञान याची सांगड घालून वाटचाल करण्याचे आवाहन भाविकांना केले.
प्रवचन झाळ्यानंतर जन्मोत्सव सोहळा सुरू झाला. आरती म्हटली गेली. शौचेगुरूजींनी संतपीठावरून सूचना देताच समोर बसलेल्या हजारो भक्तांनी निरांजने प्रज्वलीत केली. हाताला हात लागले आणि सर्वांनी रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांचे औंक्षण व अभिष्टचिंतन केले. महाराजांचे देशभरातून आलेल्या साधुसंतांनी व कुटुंबीयांनी औक्षण केले. त्यानंतर रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी यांनी सर्वांना आशीर्वाद दिले. देवाला साकडे घालून वारी उत्सवाची सांगता झाली.




