महावितरण कर्मचार्‍यांची दिवाळीत अविरत सेवा, मंडणगडमध्ये २१ तासांत वीजपुरवठा पूर्ववत


दिवाळीचा उत्सव सर्वत्र साजरा होत असताना, रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड महावितरण उपविभागात मात्र पावसाने कहर केला होता. २१ ऑक्टोबर रोजी आलेल्या मुसळधार पावसासोबत जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे मंडणगड विभागातील केळशी, बाणकोट आणि देवारे शाखांतील २१ गावे अंधारात गेली होती. या आपत्तीत ३३ केव्ही केरिल फीडर ब्रेकडाऊन झाल्याने वीजपुरवठा पूर्णपणे बाधित झाला होता.
याच दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त होता. अनेकांनी आपल्या घरी दिवाळीचा प्रकाश पेटवला, पण मंडणगड उपविभागातील महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र ग्राहकांच्या घरांमध्ये प्रकाशाचा दीप जळावा म्हणून रात्रंदिवस पावसात भिजत काम करत होते.
महावितरण टीमने तातडीने पर्यायी ११ केव्ही लाईनवरून वीजपुरवठा सुरू करण्याचे काम अवघ्या २-३ तासांमध्ये करून २१ गावांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरु केला, त्यामुळे नागरिकांना ऐन सणासुदीच्या काळात काहीसा दिलासा मिळाला.
तथापि, मुख्य ३३ केव्ही केरिल फीडर सुरू करणे ही खर्‍या अर्थाने एक आव्हानात्मक जबाबदारी होती. पावसाच्या संततधारेत आणि खडतर परिस्थितीत काम करताना १५ इन्सुलेटर बदलण्यात आले. अखेर २१ तासांच्या अथक मेहनतीनंतर ३३ केव्ही फीडर पूर्ववत करण्यात आला आणि संपूर्ण भागाचा वीजपुरवठा सुरळीत झाला.
महावितरणच्या मंडणगड उपविभागातील या कर्मचार्‍यांनी दाखवलेले धैर्य, समर्पण आणि तत्परता हे खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात कोकण परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी कौतुक केले. या कामी बाणकोट शाखेचे अभियंता अनिकेत खोंड यांच्या नेतृत्वाखाली प्रभाकर मांडवकर, हर्ष मांडवकर, रोहन दुर्गावले, संकेत पार्टे, अमोल कोळंबेकर यांच्यासह देवारे शाखेचे सुरज माळी, प्रितेश कांचावडे, केशव बोथरे, अमर पवार, शशिकांत लोंढे, धीरज कदम व केळशी शाखेचे शरद गीते, विपुल जाधव, राकेश बामणे यांच्यासह इतर कर्मचारी व जनमित्रांनी एकत्र येत वीज पुरवठा सुरळीत केला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button