मुंबईत काळाचौकीत दिवसाढवळ्या तरुणीवर प्रेम प्रकरणातून चाकू हल्ला, आरोपीने स्वतःलाही संपवले

राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसवण्याचे मोठे आव्हान गृहखात्यासमोर आहे. राज्यातून दररोज वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती समोर येत असतानाच आता मुंबईतील वर्दळीचा भाग असलेला काळाचौकी येथे खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे.शुक्रवारी (ता. 24 ऑक्टोबर) सकाळी लालबागमधील काळाचौकी येथे एका तरुणाने तरुणीवर चाकून हल्ला केला. या घटनेनंतर आरोपी तरुणाने स्वतःवर सुद्धा चाकूने हल्ला करत आत्महत्या केली. पण या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली. प्रेमप्रकरणातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

आरोपी सोनू बराई आणि हल्ला करण्यात आलेली तरुणी मनीषा यादव हे दोघेही एकाच परिसरात वास्तव्यास आहेत. पण आठ दिवसांपूर्वी या दोघांमध्ये वाद झाला होता. ज्यानंतर त्यांनी एकमेकांसोबत प्रेमसंबंध संपवले (ब्रेकअप) होते. पण ब्रेकअप होऊन सुद्धा आरोपी तरुण हा वारंवार तरुणीसोबत बोलण्याचा प्रयत्न करून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पण आज शुक्रवारी सकाळी आरोपी सोनू बराई हा तरुणी रस्त्यावरून जात असताना तिच्यासोबत पुन्हा बोलायला आला. मात्र, त्यावेळी सुद्धा तरुणीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. ज्यामुळे आरोपी आणि जखमी तरुणी मनीषा यादव यांच्यामध्ये वाद झाला. त्याचवेळी रागामध्ये आरोपी सोनूने मनीषावर हल्ला केला. पण हल्ला होताच यावेळी तरुणीने आपल्या बचावासाठी समोरच असलेल्या आस्था नर्सिंग होममध्ये धाव घेतली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे.

पण, तरुणी नर्सिंग होममध्ये पळताच आरोपी सोनू सुद्धा तिच्या मागे पळाला आणि त्याने तिथेच सर्वांसमोर स्वतःच्या गळ्यावर चाकून वार करत आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी तत्काळ आरोपी आणि जखमी तरुणी यांना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर, ही घटना इतक्या क्षणार्धात की घटनास्थळी असलेल्या लोकांना सुद्धा नेमके काय सुरू आहे हे कळले नाही, असे सांगण्यात येत आहे. तर, तरुणीवर हल्ला केल्यानंतर आरोपी तरुणानेही अगदी काही सेकंदात स्वतःच्या गळ्यावरून चाकू फिरवला. त्यामुळे या आरोपी तरुणाचा जागीच मृत्यू झाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button