जाहिरातींच्या बहुढंगी घोषवाक्यांचे जनक काळाच्या पडद्याआड!

मुंबई : ‘कुछ खास है हम सभी में’, ‘ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नहीं’ अशा बहुढंगी घोषवाक्यांसह कॅडबरी, फेविकॉल आदी नामांकित कंपन्यांच्या लोकप्रिय जाहिरातींचे जनक पीयूष पांडे यांचे शुक्रवारी पहाटे ५.५० वाजता एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. पांडे यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी दादर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भारतीय जाहिरात विश्वाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या पीयूष पांडे यांच्या निधनाने अत्यंत सर्जक व्यक्तिमत्त्व आणि गेल्या चार दशकांहून अधिक काळ जाहिरात उद्याोगातील घडामोडींचा साक्षीदार असलेले अतुलनीय पर्व लयाला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

भारतीय जाहिरात उद्योगाचे पितामह म्हणून ओळखले गेलेले पीयूष पांडे आजही सल्लागार या नात्याने ओगल्वी या नामांकित जाहिरात कंपनीशी जोडलेले होते. गेले काही दिवस त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता, त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच त्यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी नीता पांडे, भाऊ प्रसून पांडे, बहीण इला अरुण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बॉलीवूड कलाकार अमिताभ बच्चन, गीतकार आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी, अभिनेत्री रवीना टंडन आणि जाहिरात-उद्याोग क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पीयूष पांडे यांना आदरांजली वाहिली.

मूळचे जयपूरचे असलेले पीयूष पांडे जाहिरात विश्वात प्रवेश करण्यापूर्वी क्रिकेटपटू होते. त्यांनी त्याआधीही अनेक छोटी-मोठी कामे केली. त्यानंतर १९८२ साली ते त्यावेळी ओगल्वी अँड मेथर या नावाने कार्यरत असलेल्या ब्रिटिश जाहिरात कंपनीत रुजू झाले होते. याच जाहिरात कंपनीत एका सामान्य पदावर कामाला सुरुवात केलेल्या पीयूष पांडे यांनी त्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावर लवकरच जाहिरात निर्मितीच्या सर्जक क्षेत्रात प्रवेश केला.

अनेक नामांकित कंपन्या आणि त्यांच्या उत्पादनांना जाहिरातीच्या माध्यमातून चेहरा मिळवून देणाऱ्या पीयूष पांडे पुढे ‘ओगल्वी इंडिया’ या कंपनीत सर्वोच्च पदावर पोहोचले. ते २०२३ मध्ये ओगल्वी इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष या पदावरून निवृत्त झाले आणि सल्लागार या नात्याने काम पाहात होते. त्यांनी जाहिरात क्षेत्रात कामाला सुरुवात केली तेव्हा ओगल्वी कंपनीचा चेहरामोहरा ब्रिटिश असल्याने इंग्रजाळलेले वातावरण आणि कामाची पद्धत रूढ होती. पीयूष पांडे यांनी पहिल्यांदा जाहिरातीचे लेखन आणि निर्मिती करताना हिंदीवर भर दिला. दैनंदिन आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टी आणि रोजच्या जगण्यातील विसंगतीचा पुरेपूर वापर करत त्यांनी केलेल्या जाहिरातींना प्रेक्षकपसंती मिळाली.

जाहिरातींच्या गमतीशीर कल्पना

दूरचित्रवाहिनी माध्यमाचा प्रभाव हळूहळू वाढत असतानाच्या काळात गमतीशीर कल्पनांवर आधारित फेविकॉलच्या त्यांनी केलेल्या जाहिरातींची मालिका, कॅडबरीची जाहिरात, ‘हर खुशीं मे रंग लाए’ म्हणत केलेली एशियन पेंट्सची जाहिरात अशा जाहिराती खूप गाजल्या. सुरुवातीला कार्यक्रमांच्या मध्ये मध्ये येणाऱ्या नीरस जाहिराती म्हणजे वैताग असा दृष्टिकोन असलेले प्रेक्षक या जाहिराती आवडीने पाहू लागले. त्यांच्या जाहिरातींनी आपला एक स्वतंत्र प्रेक्षकवर्ग निर्माण केला आणि जाहिरात विश्वाचे एकूणच अर्थकारण बदलण्यातही त्यांचा मोठा हातभार लागला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button