
चिपळूण नगराध्यक्ष पदासाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी; इच्छुकांची लांबलचक यादी
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्षपद नऊ वर्षानंतर निवडणुकीत येत आहे. यंदा नगराध्यक्ष पदाची निवड थेट जनतेतून होणार असून, आरक्षण खुल्या गटातील असल्यामुळे इच्छुकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे.
राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पहिल्यांदाच होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याबरोबर चिपळूणमध्येही दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना गट तयार झाले आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत.
भाजपने अद्याप सावध भूमिका घेतली असली तरी, पक्षाकडून नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, माजी नगरसेवक आणि चिपळूण अर्बन बँकेचे माजी संचालक मंगेश उर्फ बाबू तांबे, माजी नगरसेवक शशिकांत मोदी आणि विजय चितळे यांची नावे चर्चेत आहेत.
शिंदे गट शिवसेनेकडून शहर प्रमुख उमेश सकपाळ यांचे नाव आघाडीवर असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून बाळा कदम हे इच्छुक आहेत, तर शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून रमेश कदम यांचे नाव पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे, तर अजित पवार गटाकडून शहराध्यक्ष मिलिंद कापडी हे इच्छुक असून त्यांच्या नावावरही लक्ष केंद्रीत झाले आहे.
याशिवाय काँग्रेसकडून माजी उपनगराध्यक्ष लियाकत शहा यांनीही पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष पदासाठी उमेदवारीची इच्छा जाहीर केली आहे.
सध्या महायुती आणि आघाडीची शक्यता कायम आहे; मात्र, नेमके कोण उमेदवार शेवटी लढणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच गजबजलेले आहे आणि शहरातील नागरिकांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.




