
आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात खासगी बसला भीषण आग,बसला लागलेल्या आगीत २० प्रवाशांचा मृत्यू
आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे एका खासगी बसला भीषण आग लागली. बंगळुरू- हैदराबाद महामार्गावर ही घटना घडली. कावेरी ट्रॅव्हल्सची बस हैदराबादहून बंगळुरूला जात होती.चिन्ना टेक्कुर गावाजवळ या बसने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर मोठा स्फोट झाला आणि बसला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की काही मिनिटांतच संपूर्ण बसला आगीने वेढा घातला.आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कुर्नूलमध्ये बसला लागलेल्या आगीत किमान २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. खिडकीच्या काचा फोडून १२ प्रवासी बाहेर पडले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. तर उर्वरीत प्रवासी बसमध्येच अडकून राहिले त्यामुळे ते जीवंत जाळले. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बसला लागलेली आग इतक्या वेगाने पसरली की स्वत:चा बचाव करण्याची अनेकांना संधी मिळाली नाही.




