
मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत कोकण विभागातून महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी..
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत कोंकण विभाग नं-४ ने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) श्रुती फणसे या विद्यार्थिनीच्या नेतृत्वाखाली आणि संघ सहकारी यांच्या साथीने मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा -२०२५ मध्ये इतिहासातील पहिले रौप्यपदक पटकावले व सांघिक उपविजेेतेपद प्राप्त केले.
दि. १५ व १६ ऑक्टोबर रोजी मुंबई विद्यापीठ, मुंबई आणि ठाणे (मुंबई) येथील जोशी – बेडेकर महाविद्यालय,यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन दादोजी कोंडदेव क्रीडा संकुल, ठाणे येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेत कोकण विभाग महिला बॅडमिंटन संघात श्रुती फणसे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी), श्रेया श्रीकांत सामंत (संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ), सबा अब्दुलकरीम शेख (बी.के. वेंगुर्ला महाविद्यालय, वेंगुर्ला), सेजल सुनील कदम, महेनूर रफिक खान (डीबीजे महाविद्यालय, चिपळूण) या विद्यार्थिनींची मुंबई विद्यापीठ महिला बॅडमिंटन स्पर्धेसाठी कोकण विभाग महिला बॅडमिंटन संघात निवड झाली होती.
कोकण विभाग महिला बॅडमिंटन संघाला क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, क्रीडा शिक्षक प्रा. क्रिस्टन सॅबेस्टियन रॉड्रिक्स, प्रा. कल्पेश बोटके तसेच माधव फणसे यांचे मार्गदर्शन लाभले.
मुंबई विद्यापीठ महिला बॅडमिंटन स्पर्धेतील रौप्यपदक आणि उपविजेेतेपद प्राप्त करणाऱ्या कोकण विभाग-४ महिला बॅडमिंटन संघाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्प पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सदस्य, कोंकण विभाग -४ चे कमिटी सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक सहकारी, कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




