
कोकण रेल्वे प्रशासनाने दुहेरीकरण करण्यावर भर द्यावा कोकणवासी यांची मागणी…
कोकण रेल्वे प्रशासनाने दुहेरीकरण करण्यावर भर द्यावा, अशी मागणी कोकणकरांनी कोकण रेल्वेकडे केली आहे.
कोकण रेल्वे ही कोलाड ते ठोकुर अशा 739 किमी अंतरापर्यंत आहे. त्यात रोहा ते वीर 46.8 किमी रेल्वे मार्गाचे ऑगस्ट 2021 रोजी दुहेरीकरण पूर्ण झाले, परंतु गेली चार वर्षे दुहेरीकरणाला गती मिळाली नाही. त्यामुळे प्रवाशांना विलंबाचा फटका सहन करावा लागतो. कोकण रेल्वे एकेरी मार्गाची असल्याने, रेल्वेगाड्या वेळेत धावण्यास अडथळा झाला आहे. त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास वेगवान होण्यासाठी, दुहेरीकरण करणे आवश्यक आहे. दुहेरीकरण फक्त विकासासाठी नाही तर सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे, असे प्रवाशांनी सांगितले.
बुधवारी झालेला 35 वा वर्धापन दिन कोकण रेल्वेचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून शेवटचा ठरवून पुढील वर्षीपासून भारतीय रेल्वेचाच एक विभाग म्हणून साजरा व्हावा किंवा कोकण रेल्वेचे मध्य रेल्वे विभागात विलीनीकरण करावे, अशी मागणी कोकणवासियांनी केली. तसेच कोकण रेल्वेवरील प्रवासी वाहतुकीसाठी 40 टक्के अधिभार रद्द करावा व कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने विशेष निधीची तरतूद करावी. यामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल व कोकणातील पर्यटन व व्यापाराला चालना मिळेल. तसेच, कोकणवासीयांना इतर भारतीयांप्रमाणेच समान वागणूक मिळेल, अशी मागणी करण्यात आली.




