
मथुरेत मोठा अपघात! २५ भाविकांना घेऊन जाणारी बोट यमुना नदीत उलटली; सहा ठार, मृतांची संख्या वाढण्याची भीती!
Boat Capsize In Yamuna River : उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे शुक्रवारी दुपारी मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. केसी घाटावर भाविकांना घेऊन जाणारी एक बोट तरंगत्या पुलाला धडकून यमुना नदीत उलटली. या बोटीत २० ते २५ भाविक होते अशी माहिती समोर आली असून, यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण अद्याप बेपत्ता असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले असून,डायव्हर्स बुडालेल्यांचा शोध घेत आहेत.
अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
समोर आलेल्या माहितीनुसार, या बोटीतून अंदाजे २० ते २५ यात्रेकरू प्रवास करत होते. बोट तरंगत्या पुलाला धडकून यमुना नदीत उलटली. पोलीस पथकांनी डायव्हर्सच्या मदतीने काही जणांनी सुखरुप बाहेर काढले तर, सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचावलेल्या भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बचावकार्य सुरू
बोटीचा अपघात झाल्याची माहिती मिळताच, पोलीस आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित बचावकार्य सुरू केले. अपघातस्थळी मोठी गर्दी जमल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे. प्रशासनाने जनतेला शांत राहून बचाव पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे
जिल्हाधिकारी काय म्हणाले?
जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी सहा भाविकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बोटीत असणारे सर्व पर्यटक पंजाबचे होते, असेही सिंह यांनी स्पष्ट केले आहे. ‘सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आतापर्यंत १६ ते १७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे,’ असे जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी केले आहे.
बोटीमध्ये २५ हून अधिक पर्यटक
समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, यमुनात बुडालेल्या बोटीमध्ये २५ हून अधिक पर्यटक होते असे सांगण्यात येते. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या पथकांसह सुमारे ५० स्थानिक डायव्हर्सच्या मदतीने सध्या यमुना नदीत बचावकार्य सुरू आहे.




