हापूसला योग्य भाव मिळावा, तसेच आंब्यातील भेसळ थांबावी, अन्यथा रस्त्यावर ‘आंबा पार्टी’ करू : राजू शेट्टी


हापूस आंब्याच्या उत्पादनात यंदा जवळपास ७० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे, हापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सद्य:स्थितीत हापूसची चांगली आवक होत आहे. हापूसला योग्य भाव मिळावा, तसेच आंब्यातील भेसळ थांबावी, यासाठी बाजार समितीसह आडतदार वर्गाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. दरम्यान, शहरात कोठेही हापूसच्या नावावर अन्य आंब्याची विक्री झाली, तर जेथून त्याला पुरवठा करण्यात आला आहे, त्याठिकाणी रस्त्यावर आंबा ओतून आंबा पार्टी करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी, बाजार समिती प्रतिनिधी आणि आडतदार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक मार्केटयार्ड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात गुरुवारी पार पडली. यावेळी माजी आमदार बाळासाहेब माने, बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, उपसभापती शशिकांत गायकवाड, सचिव डॉ. राजाराम धोंडकर, संचालक दिलीप काळभोर, रोहिदास उंद्रे, सुदर्शन चौधरी, रवींद्र कंद, गणेश घुले, संतोष नांगरे, बापू भोसले यांसह अन्य संचालक, अडतदार सिद्धार्थ कुंजीर, सिद्धार्थ खैरे, नितीन कुंजीर, करण जाधव आदी आडतदारांसह आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी शेतकरी ते थेट ग्राहक यादृष्टीने विक्री करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पुण्यातही कशाप्रकारे या गोष्टी राबविता येतील याचा विचार सुरू आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगड, पालघर तसेच कोकणातील अन्य शेतकऱ्यांचेही आंबे कशाप्रकारे बाजारात येतील यादृष्टीने आडतदारांनी प्रयत्न करावा. यावेळी, शेतकऱ्यांच्या फळांना चांगला भाव मिळावा यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही बाजार समिती व आडतदारांनी दिली.
यावेळी सभापती प्रकाश जगताप म्हणाले की, मार्केटयार्ड फळबाजारात कोकणातून येणाऱ्या शेतकऱ्यांकडून आंब्याला जागा उपलब्ध करून दिली जाते. तर, समितीकडून आंबा महोत्सवाला प्रोत्साहन दिले जाते. त्याचबरोबर बाजारातील आडते व्यापारी वर्गाने विक्रीचे नियोजन करत योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button