
हर्डी येथे हनुमान जन्मोत्सवानिनित्त संगीत नमनाचे सादरीकरण
श्रीकृष्णाची भूमिका साकारलेली चिन्मयी जोगले खास आकर्षण : कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


राजापूर : शहरानजीकच्या हर्डी येथे श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
हर्डी गावातील स्थानिक कलाकारांनी अथक परिश्रम घेऊन अवघ्या आठ दिवसात प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आणि उत्तम कलाविष्कारांनी नटलेले बहुरंगी संगीत नमन सादर केले. या नमन कलेमध्ये श्री कृष्णाची भूमिका साकारलेली चिन्मयी जोगले खास आकर्षण ठरली होती. नवोदित कलाकारांनी सादर केलेल्या या पारंपरिक नमन लोककलेचे अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकलीच, शिवाय कमी अवधीत नमना सारखा मनोरंजनाचा कार्यक्रमाची तालीम करून उत्तम सादरीकरण केल्याबद्दल कलाकारांचे संपूर्ण तालुक्यात कौतुक केले जात आहे.
कार्यक्रमाला राजापूर शहरासह परिसरातील अनेक गावांमधून मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. नमन या पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून कलाकारांनी धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रभावी प्रयत्न केला. सादरीकरणातील सुरेल गायन, संवादांची रंगत आणि अभिनय कौशल्यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.
प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद व बक्षीसे देत कलाकारांचे कौतुक केले. तसेच प्रत्येक कलाकाराच्या प्रेवेशावेळी टाळ्यांचा कडकडाट होत होता, ज्यामुळे कलाकारांचा उत्साह अधिकच वाढला. नमन या लोककलेची लोकप्रियता आणि प्रभाव आजही कायम असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले. अशा कार्यक्रमांमुळे पारंपरिक लोककलेचे जतन व संवर्धन होण्यास मोठी मदत होत असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त करण्यात आली.




