समृद्धी महामार्गावरील अपघातात सात महिला कामगारांचा मृत्यू!

जालना : समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी भरधाव वाहनाने कामगारांच्या दुसऱ्या गाडीला दिलेल्या धडकेत सात मजुरांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमधील सातही महिला आहेत. तर अन्य दहा ते बारा मजूर जखमी झाले. नागपूरहून मुंबईच्या दिशेने वेगात निघालेले वाहन कडवंचीनजीक समृद्धीवर सफाईचे काम करून एका वाहनात बसत असतानाच हा अपघात घडला. समृद्धी महामार्गावर एका रांगेत मृतदेह पडून रक्ताचा सडा पडल्याचे चित्र होते.

अलकाबाई दादाराव आदमाने (वय ४५), मीना परमेश्वर आदमाने (४५), कांचनबाई प्रकाश आदमाने (५०), लक्ष्मीबाई संतोष मदन (३५), सुमनबाई कचरू आदमाने (७०, रा. सर्व निधोना) व कडुबाई रामदास मदन (३५) आणि ताराबाई गहेनाजी चौधरी (६०, दोघीही रा. केळीगव्हाण), अशी मृतांची नावे आहेत. या सर्व समृद्धी महामार्गावर सफाईचे काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर मृत व जखमींना तातडीने जालन्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघाताची माहिती मिळताच आमदार अर्जुन खोतकर, शिवसेनेचे (शिंदे) नवे संपर्क प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर आदींनी रुग्णालयात धाव घेतली.

महिन्यातील दुसरा अपघात

समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ लोखंडी सळया घेऊन भरधाव निघालेल्या ट्रकने रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या ओढण्याच्या कामासाठी आलेल्या पाच कामगारांना धडक दिली. ६ मार्च रोजी घडलेल्या या घटनेत दोन मजूर जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात पोहोचल्यानंतर मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अपघात एवढा भीषण होता, की उताराच्या भागातून भरधाव आलेला ट्रक पाच कामगारांना धडक देऊन एका जेसीबीला, तसेच अन्य एका चारचाकी मोठ्या वाहनालाही जाऊन धडकला. ही घटना वरझडी परिसरातील मुंबई काॅरिडाॅरवरील चॅनल ४०६ जवळ घडला. गवण्याचे काम सुरू आहे. याच कामासाठी काही मजूर आलेले होते. त्यांचे काम सुरू असतानाच भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. सळया घेऊन जाणारा ट्रक मुंबईकडे जात होता. या घटनेची नोंद चिकलठाणा पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू होती.

जेवायला बसले असताना अपघात

दुपारी मजुरांनी जेवणाची सुटी झाल्याने काम थांबवले होते. एका ट्रकच्या सावलीत जेवण करत असतानाच मुंबईकडे सळया घेऊन निघालेला भरधाव ट्रक येऊन धडकला. यात दोघांचा जागेवरच, तर एकाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) नेत असताना मृत्यू झाला.

अपघातातील जखमींची नावे

कविता शिरसाठ, मंगल शिनगारे, प्रयाग वाघ व दिनेश गायकवाड हे अपघातात जखमी झाले असून, त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलीस निरीक्षक किशोर चौधरी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button