संगमेश्वरला समर स्पेशल गाड्यांचा थांबा नाही; प्रवाशांत नाराजी

रिकाम्या सीट्स असूनही दुर्लक्ष, कोकण रेल्वेकडे तातडीची मागणी

संगमेश्वर : कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या संगमेश्वर रेल्वे स्टेशनला समर स्पेशल गाड्यांचा थांबा न दिल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः 06013 / 06014 (थिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन – थिरुवनंतपुरम सेंट्रल) या गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा नसल्याने स्थानिक प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या गाड्यांना माणगाव, रोहा, मडगाव तसेच इतर अनेक स्थानकांवर थांबे देण्यात आलेले असताना संगमेश्वरकडे दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

संगमेश्वर हे कोकणातील एक महत्त्वाचे प्रवासी केंद्र असून येथून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. विशेष म्हणजे, हे स्थानक वार्षिक सुमारे सहा कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न देणारे असूनही येथे थांबा न देणे आश्चर्यकारक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, या समर स्पेशल गाड्यांमध्ये अनेक वेळा शेकडो सीट्स रिक्त राहत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे संगमेश्वर येथे थांबा दिल्यास प्रवाशांची सोय होण्याबरोबरच रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर “निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर” या फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला अधिकृत पत्र देत तात्काळ थांबा देण्याची मागणी केली आहे.

तसेच, स्थानिक नागरिकांकडूनही या मागणीला मोठा पाठिंबा मिळत असून, संगमेश्वरला लवकरात लवकर समर स्पेशल गाड्यांचा थांबा द्यावा, अशी जोरदार मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button