
विमानप्रवास, गॅस महागले!
पीटीआय, नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक पातळीवर ऊर्जासंकट निर्माण झाले असून त्याच्या झळा ग्राहकांना बसत आहेत. जेट इंधन अर्थात एटीएफच्या किमती जागतिक पातळीवर दुपटीने वाढल्या असल्या तरी देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी ही दरवाढ ८.५ टक्क्यांच्या मर्यादेत केली गेली. मात्र तरीही देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या ‘इंडिगो’ने तिकिटांवर वाढीव इंधन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलिंडरच्या दरातही १९५.५० रुपयांची तर प्रीमियम इंधनांच्या दरात १.५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता २,०३१ रुपयांवर पोहोचली आहे. महिनाभरात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमध्ये झालेली ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी १ मार्च रोजी १९ किलोच्या सिलिंडरमागे ११४.५ रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ केली गेलेली नाही.
सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय निकष आणि विनिमय दराच्या आधारे विमान इंधन (एटीएफ) आणि एलपीजीच्या दरांचा आढावा घेऊन त्यात बदल करतात. इराण-अमेरिका युद्धामुळे ऊर्जा पुरवठा साखळीत व्यत्यय आल्याने, जागतिक तेल दरात जवळपास ५० टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे.
देशात विकल्या जाणार्या एकूण वाहन इंधनापैकी दोन ते पाच टक्के वाटा असलेल्या निवडक प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही प्रति लिटर १.५० रुपयांनी वाढ करण्यात आली. ‘एक्स्ट्रा ग्रीन’ डिझेल ९२.९९ रुपये आणि १०० ऑक्टेन पेट्रोल ११ रुपयांनी वाढवून १६० रुपये प्रति लिटर करण्यात आले.
देशांतर्गत विमान कंपन्यांना संरक्षण
जागतिक पातळीवर तापलेल्या खनिज तेलाच्या दरामुळे जेट इंधन अर्थात एटीएफचे दर दुपटीहून अधिक वाढणे अपेक्षित असतानाही बुधवारी देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी ही दरवाढ केवळ ८.५ टक्क्यांच्या मर्यादेत केली गेली. देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी वापरल्या जाणार्या एटीएफच्या दरात प्रति किलोलीटर ८,२८९.०४ रुपयांची वाढ करण्यात आली. यामुळे गेल्या महिन्यातील ९६,६३८.१४ रुपये प्रति किलोलीटर असलेला दर आता १,०४,९२७.१८ रुपये प्रति किलोलीटर झाला आहे. मुंबईत एटीएफचा प्रति किलोलीटर दर ९८,२४७ रुपयांवर पोहोचला आहे. परदेशी विमान कंपन्यांसाठी मात्र एटीएफच्या दरात प्रति किलोलीटर १,१०,७०३.०८ रुपयांची (११४.५ टक्के) मोठी वाढ करण्यात आली असून, त्यांचा दर आता २,०७,३४१.२२ रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचला आहे. या कंपन्यांच्या तुलनेत देशांतर्गत विमान कंपन्यांना निम्मीच किंमत मोजावी लागेल. एटीएफचा दर २ लाख रुपये प्रति किलोलिटरचा टप्पा ओलांडण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे.




