राजापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे. पाणीपुरवठ्यावर मर्यादा

राजापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे तसेच वीजपुरवठ्यातील अडचणींमुळे राजापूर शहरातील पाणीपुरवठ्यावर मर्यादा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत राजापूर नगरपरिषदेतर्फे नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

नगरपरिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरास शिळ येथील जॅकवेल मार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, एमएसईबीकडून होत असलेल्या भारनियमनामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून त्यामुळे पाणी साठवण टाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाहीत. परिणामी, शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून पाणीपुरवठ्याच्या वेळाही अनियमित राहू शकतात.

उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नळजोडणीवर पंप लावू नयेत, अन्यथा संबंधित नळजोडणी कायमस्वरूपी बंद करण्यात येईल, असा इशाराही नगरपरिषदेकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, शहरातील पाणीपुरवठा दर शनिवार देखभाल व दुरुस्ती कामांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राजापूर नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button