राजापूर रोड स्थानकातील लिफ्टचे काम रखडले; प्रवाशांमध्ये नाराजी


राजापूर रोड रेल्वे स्थानकातील
प्रवाशांसाठी मंजूर करण्यात आलेल्या लिफ्टच्या कामाला अद्यापही प्रत्यक्ष सुरुवात झालेली नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी कोकण रेल्वे प्रशासनाने सुमारे ६० लाख रुपयांच्या या प्रकल्पाला मंजुरी देत निविदा प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र त्यानंतर कोणतीही ठोस हालचाल दिसून न आल्याने “काम नेमके कधी सुरू होणार?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे स्थानक खोलगट भागात असल्यामुळे प्रवाशांना दररोज चढ-उतार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि आजारी प्रवाशांसाठी ही परिस्थिती अधिकच त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे येथे लिफ्ट सुविधा सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती.

पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. समितीचे प्रशासकीय प्रमुख आदिनाथ कपाळे यांनी कोकण रेल्वे प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत लिफ्टसाठी मंजुरी व निविदा प्रक्रिया पूर्ण झाली.

दरम्यान, कोकणकन्या, तुतारी, मांडवी, नेत्रावती, दिवा-सावंतवाडी पॅसेंजर तसेच उधना व मडगाव-नागपूर गाड्यांना येथे थांबा असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे लिफ्टची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे; मात्र, काम रखडल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली असून प्रशासनाने या कामाला तातडीने गती देऊन लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button