
रस्ते, पाणी अडवणार्यांवर कारवाई होणार-पालकमंत्री उदय सामंत यांचे अधिकार्यांना निर्देश
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, प्रांताधिकारी जीवन देसाई, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद सर्व सभापती, पं.स.सभापती, शिवसेना तालुका प्रमुख बंड्या साळवी, बाबू म्हाप, तसेच सर्व खात्याचे खातेप्रमुख उपस्थित होते.
जनता दरबारामध्ये रस्ता अडवल्याच्या आणि पाणी बंद केल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला होता. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रशासनाला महत्वपूर्ण निर्देश दिले. जिल्ह्यातील सर्व पारंपरिक रस्ते आणि पायवाटांचा सर्व्हे करा, गरज पडल्यास ग्रामसभा लावा, पण या रस्त्यांची नोंद सातबारा उतार्यावर अधिकृतपणे २३ नंबरवर करा. एकदा का नोंद झाली की प्रशासनाकडून त्यांचा विकास केला जाईल, असे सामंत यांनी सांगितले. असा निर्णय घेणारा रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जनता दरबारात सादर झालेल्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी प्रशासनाला सक्त सूचना सामंत यांनी केल्या. मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकार्यांना जाब विचारल्याने अनेक तक्रारदार नागरिकांना जागीच न्याय मिळाला. प्रश्न घेऊन येणार्या जनतेसाठी जिल्हा प्रशासनाने तळमजल्यावर नोदणी कक्ष, टोकन, दुसर्या मजल्यावर प्रतिक्षा कक्ष अशी सुविधा केली होती. तब्बल तीन ते साडेतीन तास पालकमंत्री, अधिकारी जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बसून होते भूसंपादन मोबदला, रस्ता डांबरीकरण, मजबुतीकरण, मुख्यमंत्री सडक योजना, खंडित वीजपुरवठा, पोल शिफ्ट, प्रधानमंत्री आवास योजना, जमिनीचे प्रश्न, बीएसएनएल टॉवर, वीज, नळपाणी, गृहनिर्माण सोसायटी, माजी सैनिक संदर्भातील नुकसान भरपाई देणे असे अनेक प्रश्न जनता आज दरबारात आली होती.
www.konkantoday.com




