रत्नागिरी शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा, रक्तदान करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन.

रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) तसेच शहरातील खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. सध्या अवघ्या आठवडाभर पुरेल इतकाच साठा उपलब्ध असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, मंडळे तसेच नागरिकांनी मुढाकार घेत तातडीने रक्तदान करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्हा रुग्णालयात दररोज साधारण २५ ते ४० रक्तपिशव्यांची गरज भासते, तर वर्षभरात ही गरज सुमारे ९ हजार पिशव्यांपर्यंत पोहोचते. मात्र सध्याच्या स्थितीत केवळ १०० रक्तपिशव्यांचा साठा शिल्लक असल्याने मोठी तफावत निर्माण झाली आहे. लोकसंख्या वाढ, शहराचा विस्तार आणि रुग्णसंख्येत वाढ यामुळे रक्ताची मागणी सातत्याने वाढत आहे.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्याचा परिणाम स्वेच्छा रक्तदानावर झाला आहे. याशिवाय सध्या शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू असल्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन कमी झाले आहे. पुढील मे महिन्यात सुट्ट्यांचा काळ सुरू होणार असल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गंभीर आजारांचे रुग्ण, अपघातग्रस्त तसेच शस्त्रक्रिया होणार्‍या रुग्णांसाठी रक्त व प्लेटलेट्सची तातडीने गरज असते. रक्ताला कोणताही पर्याय नसल्यामुळे मानवी रक्तदान हाच जीव वाचवण्याचा एकमेव मार्ग असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button