रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरात हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विक्रेत्यांचा सुळसुळाट

ग्राहकांची फसवणूक : फळ किडके निघत असल्याच्या तक्रारी

रत्नागिरी : कोकणात आता आंब्याचा हंगाम सुरू झाल्याचा फायदा घेत रेल्वेस्थानक परिसरात हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. बाहेरून येणारे पर्यटक, प्रवासी कमी दरात उपलब्ध असलेला हा आंबा हापूस म्हणून विकत घेत असून, कापल्यानंतर फळांना कीड लागली असल्याच्या तक्रारी ग्राहक करीत आहेत. यामुळे बाहेरून आलेल्या ग्राहकांची फसवणूक होत आहेच, शिवाय कोकणाच्या राजाच्या वैभवलाही धक्का पोहोचत आहे.

सध्या बाजारात अस्सल मोठ्या आकाराच्या हापूस मोठ्या आकाराच्या फळाचा दर डझनाला १२०० ते १५०० रुपये, तर मध्यम आकाराच्या हापूस फळाचा ८०० ते १२०० रुपये असा आहे; मात्र रेल्वेस्थानक परिसरात कर्नाटकी आंबा हापूस आंबा या नावाने विकला जात असून तो पाचशे ते सातशे रुपये डझन दराने उपलब्ध आहे. रेल्वेस्थानकात पुणे, मुंबईसह बाहेरून येणारे पर्यटक हेच फळ हापूस म्हणून खरेदी करत आहेत; मात्र यातील बरेचशी फळे ही कापल्यानंतर किडकी निघत आहे. त्यामुळे बाहेरून येथे आलेल्या प्रवाशांची आणि हापूस म्हणून हे फळ विकत घेणाऱ्या पर्यटक, प्रवाशांची फसवणूक तर होतच आहे, शिवाय सातासमुद्रा पार पोहोचलेल्या कोकणच्या राजाच्या नावाला बट्टा लागत आहे.

मुळात हे विक्रेतेच रत्नागिरीतील नसून ते परप्रांतीय आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानक येथील बाहेरील तिठ्यावर हे विक्रेते ही आंबा विक्री करीत आहेत. आंबा विक्री करताना हे विक्रेते आपली ओळखही लपवत आहेत. विक्रीसाठी ठेवलेली ही फळे वरून कोकणी आंब्यासारखी दिसत असली, तरी कापल्यानंतर या फळांना कीड लागली असल्याच्या तक्रारी ग्राहक करीत आहेत मात्र प्रवासी आणि येथे आलेला पर्यटक कोकणातील आंबा आवाक्यातील दर असल्यामुळे विकत घेत आहेत; हे फळ खराब निघत असल्यामुळे हापूसचे नाव खराब होण्याची शक्यता असून ग्राहकांचीही मोठी फसवणूक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button