
रत्नागिरी पोस्टल विभागाची गोवा विभागात उल्लेखनीय कामगिरी
डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांची माहिती
रत्नागिरी : या वर्षात रत्नागिरी पोस्टल विभागामध्ये एकूण २ लाख ३४ हजार ९४० एवढी नवीन खाती उघडून रत्नागिरी विभागाने गोवा विभागात उल्लेखनीय कामगिरी करून ठसा उमटवला आहे, अशी माहिती डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी पत्रकारांना दिला.
आज स्पर्धेच्या युगातही जनसामान्यांचा टपालखात्यावरील असलेला विश्वास हीच टपालखात्याची खरी ताकद आहे, हे सरत्या आर्थिक वर्षाचा आढावा घेताना जाणवले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
ते म्हणाले, डोंगराळ प्रदेश, भौगोलिक वैविध्य, बहुतांश ग्रामीण भाग, तेथील लोकांचे उत्पन्न या सगळ्या अडचणींवर मात करून रत्नागिरी विभागाने मोलाची कामगिरी केली आहे. २०२३-२४ मध्ये रत्नागिरी विभागामध्ये एकूण १ लाख ३१ हजार ९९६, २०२४-२५ मध्ये १ लाख ४५ हजार ९०३ नवीन खाती उघडण्यात आली होती. सरत्या वर्षात ही आकडेवारी दुप्पट झाली आहे.
मार्च २०२४ ला रत्नागिरी विभागामध्ये एकूण ९ लाख ७२ हजार १०८ एवढी खाती सुरू होती. मार्च २०२५ च्या अखेरीस १० लाख ३७ हजार ७१२ एवढी खाती चालू होती. मार्च २०२६ च्या अखेरीस हा आकडा ११ लाख ८२ हजार २२९ वर पोहोचला आहे. यापुढेही ग्राहकांनी पोस्टखात्याच्या जास्तीत जास्त सेवेचा लाभ घ्यावा आणि पोस्टखात्याप्रती आपला विश्वास अढळ ठेवावा, असे आवाहन रत्नागिरी डाक विभागाचे अधीक्षक कुलकर्णी यांनी केले आहे.
योजनांनिहाय चालू खात्यांची आकडेवारी
बचत खाते – ३ लाख ७३ हजार ५२३
रिकरिंग खाते (आरडी) – ४ लाख ३८ हजार १४
मुदत ठेव – २ लाख ४७ हजार ६३०
सुकन्या समृद्धी योजना – ७२ हजार ८५७
पीपीएफ – १५ हजार ७६८
वरिष्ठ नागरिक योजना – १४ हजार ५२९
मासिक उत्पन्न योजना – १९ हजार ७१०
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (८७) – १६६
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (९२)- ३२
एकूण ११ लाख ८२ हजार २२९




