रत्नागिरी जिल्ह्यातील शिवभोजन केंद्राची स्थिती सुधारणार, १ कोटी ३९ लाख ६८ हजार रुपयांचे अनुदान मंजूर


गेल्या सात महिन्यांपासून आर्थिक विवंचनेत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने जिल्ह्यासाठी १ कोटी ३९ लाख ६८ हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले असून, दोन दिवसांत ही रक्कम केंद्र चालकांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. यामुळे निधीअभावी रखडलेली ही योजना आता पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने रुळावर येण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात ऑगस्ट २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या सात महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीत अनुदान रखडले होते. वाढती महागाई, गॅस सिलिंडरचे दर आणि कामगारांचा पगार यामुळे केंद्र चालकांचे कंबरडे मोडले होते. आर्थिक चणचणीमुळे अनेक चालकांनी आपली केंद्रे बंद केली होती, तर काही जण कर्ज काढून केंद्रे चालवत होते. आता अनुदान प्राप्त झाल्याने जिल्हा पुरवठा विभागाने देयके पूर्ण करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली आहे.
दोन दिवसांत खात्यावर रक्कम जमा होणार जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुदानाची रक्कम जिल्हा कोषागाराकडे सादर करण्यात आली आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या दोन दिवसांत ही रक्कम केंद्र चालकाना वितरित केली जाईल रखडलेले अनुदान मिळाल्यामुळे बंद पडलेली १४ केंद्रे पुन्हा सुरू होऊन गरजू नागरिकांना स्वस्त दरात भोजन उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button