
रत्नागिरीच्या तरुणाची हिमालयात दमदार कामगिरी; अन्नपूर्णा बेस कॅम्प सर करण्याचा पराक्रम
रत्नागिरी
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची भ्रमंती करत साहसाची वाट चालणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील करबुडे (मौजे कपिल वास्तू नगर) येथील सुपुत्र कुमार तेजस अनिल जाधव यांनी हिमालयातील नेपाळस्थित अन्नपूर्णा बेस कॅम्प (४१३० मीटर) सर करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. प्रतिकूल हवामान, सततचा पाऊस, बर्फवृष्टी आणि क्षणोक्षणी बदलणाऱ्या वातावरणाचा सामना करत त्यांनी जिद्द, चिकाटी आणि धैर्याच्या जोरावर ही मोहीम यशस्वी केली.
जगातील उंच पर्वतरांगांमध्ये गणल्या जाणाऱ्या हिमालय पर्वतरांग मधील हा ट्रेक अत्यंत आव्हानात्मक मानला जातो. साधारणपणे पाच ते सहा दिवसांत पूर्ण होणारा हा बेस कॅम्प ट्रेक तेजस जाधव यांनी अवघ्या साडेतीन दिवसांत, तीन टप्प्यांत पूर्ण करून आपली क्षमता सिद्ध केली. तेजस यांनी शुक्रवार, ३ एप्रिल रोजी मुंबईहून काठमांडू येथे प्रस्थान केले. त्यानंतर ४ एप्रिल रोजी बस प्रवास करून त्यांनी ट्रेकच्या प्रारंभ बिंदूपर्यंत मजल मारली. ५ एप्रिलपासून सुरू झालेला ट्रेक त्यांनी ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अन्नपूर्णा बेस कॅम्प गाठून पूर्ण केला. या ट्रेकदरम्यान सततची बर्फवृष्टी, घसरडे बर्फाचे मार्ग, अनिश्चित हवामान आणि थंडी अशा कठीण परिस्थितींना सामोरे जात कमी कालावधीत ही मोहीम पूर्ण करणे हे धाडसाचे आणि कौतुकास्पद पाऊल मानले जात आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही प्रकारचे प्रायोजकत्व किंवा आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर हा पराक्रम गाठला.
सामाजिक कार्यकर्ते, लेखक अनिल जाधव यांचे तेजस हे ज्येष्ठ सुपुत्र असून, ते व्यवसायाने अभियंता आहेत आणि खारघर, नवी मुंबई येथे एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहेत. लहानपणापासूनच कमांडो प्रशिक्षण घेतलेले तेजस शालेय जीवनात फुटबॉलमध्ये राज्यस्तरावर खेळले आहेत. गिर्यारोहणासोबतच विविध देश-प्रदेशांची भ्रमंती आणि वाचनाची आवड त्यांनी जपली आहे.
यापूर्वी तेजस जाधव यांनी लडाख आणि तिबेटमधील ट्रेकही एकट्याने पूर्ण केले असून, महाराष्ट्रासह देशभरातील अनेक दुर्गम गड-किल्ल्यांवर त्यांनी भटकंती केली आहे. कुटुंबीय जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःची साहसी आवड जोपासणाऱ्या या तरुणाने अन्नपूर्णा बेस कॅम्प सर करून रत्नागिरी जिल्ह्याचा मान उंचावला आहे. तेजस जाधव यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील साहसी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



