
युद्ध संपताच गॅस सिलेंडरबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
: इराण आणि इस्राईल- अमेरिका यांच्यातील युद्ध संपताच भारतीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण युद्ध जरी इराण, इस्राईन आणि अमेरिकेत सुरु असल तरी त्याचा मोठा फटका भारताला सोसावा लागला होता.
देशातील गॅस आणि ऊर्जा आयातीवर मोठा प्रभाव पडल्याने देशांतर्गत तुटवडा जाणवू लागला. केंद्र सरकारने सातत्याने LPG गॅस बुकिंग आणि वितरणात नवनवीन नियम लागू केले होते. सर्वसामान्य माणूस आणि व्यावसायिक अक्षरशः मेटाकुटीला आले होते. मात्र आता युद्ध संपताच केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी वापरणाऱ्या उद्योगांना दिलासा दिला आहे.
देशभरात एलपीजीची टंचाई लक्षात घेऊन गॅस पुरवठ्याचा नवा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. याबाबत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानेने एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे, ज्यामुळे अनेक उद्योगांना आता एलपीजीचा पुरवठा अधिक सुलभ होणार आहे. सरकारने व्यावसायिक सिलेंडरच्या वाटपासाठी एक नवीन नियम लागू केला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा औषधनिर्माण, अन्न प्रक्रिया आणि कृषी क्षेत्राला होणार आहे. हि क्षेत्रे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्वाची मानली जातात.
नव्या नियमानुसार, काही निवडक उद्योगांना त्यांच्या पूर्वीच्या वापराच्या सुमारे ७० टक्के एलपीजी पुरवठा मिळणार आहे. यामुळे उत्पादनावर होणारा परिणाम कमी होईल आणि उद्योगांना स्थिरता मिळेल. केंद्र सरकारने संपूर्ण क्षेत्रासाठी एकूण मर्यादा 0.2 TMT प्रति दिवस जाहीर केली आहे. सरकारने हे सुद्धा स्पष्ट केले आहे की, ज्या कारखान्यांना एलपीजीऐवजी नैसर्गिक वायू वापरणे शक्य नाही, त्यांना प्राधान्य दिले जाईल. तसेच, उद्योगांनी तेल कंपन्यांकडे नोंदणी करणे आणि पाइपद्वारे गॅस (PNG) जोडणीसाठी अर्ज करणे आवश्यक असेल मात्र, जिथे एलपीजी हा उत्पादन प्रक्रियेचा अत्यावश्यक भाग आहे, तिथे ही अट शिथिल करण्यात आली आहे.
याशिवाय, सरकारने आधीच ७० टक्के एलपीजी कोटा राज्यांना दिला आहे. आणि जे राज्य PNG सुधारणा जलदगतीने राबवतील, त्यांना अतिरिक्त १० टक्के कोटा मिळणार आहे. या निर्णयामुळे उद्योगांना मोठा दिलासा मिळणार असून उत्पादन आणि पुरवठा साखळी अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, २३ मार्चपासून सुमारे ७.८ लाख ५-किलोचे फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडर विकले गेले आहेत. फेब्रुवारी महिन्यात दररोज सरासरी ७७,००० सिलिंडर विकले जात होते, त्या तुलनेत सोमवारी देशभरात १.०६ लाखांहून अधिक ५ किलोचे सिलिंडर विकले गेले. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी गेल्या चार दिवसांत ५किलो सिलिंडरसाठी सुमारे १,३०० जनजागृती शिबिरे आयोजित केली, ज्यामध्ये १०,००० हून अधिक सिलिंडर विकले गेले.




