
मुंबई-गोवा महामार्गावर कळंबनी येथे भीषण अपघात; दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी, गर्दीमुळे दुसरा अपघात

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर कळंबनी परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून, अपघातानंतर महामार्गावर निर्माण झालेल्या गर्दीमुळे आणखी एक अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी नियंत्रण सुटून महामार्गावरील पादचारी पुलावर जाऊन कोसळली. अपघातानंतर जखमींची अवस्था गंभीर होती.
या घटनेची माहिती मिळताच सरपंच भगवान साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते विनय तोडणकर तसेच भरणे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संतोष नलावडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्परता दाखवत जखमींना त्वरित कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या या मदतकार्यामुळे जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली.
दरम्यान, अपघातानंतर महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. अनेकजण कुतूहलाने अपघात पाहण्यासाठी थांबल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. याच गर्दीमुळे दुसरा अपघात घडला. गोव्याच्या दिशेने निघालेल्या एका कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने त्याच्या मागे येणाऱ्या कोकण रेल्वेच्या कामावरील पिकअप व्हॅन चालकाने समोरील वाहनाला धडक टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पिकअप व्हॅन महामार्गावर पलटी झाली.
या दुसऱ्या अपघातात पिकअप व्हॅनमधील दोघेजण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
या सलग अपघातांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत तसेच अपघातस्थळी अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.




