
माय भारत बजेट क्वेस्ट 2026 – मुंबई विभागाचा भव्य समारोप यशस्वीरित्या संपन्न

माय भारत प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातर्फे आयोजित माय भारत बजेट क्वेस्ट 2026 (मुंबई विभाग) चा भव्य समारोप डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे यशस्वीरित्या पार पडला. 12 ते 13 एप्रिल 2026 या दोन दिवसांच्या कालावधीत आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्र, गोवा आणि पुडुचेरी येथील युवक-युवतींनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमातून सहभागी शासन आणि युवकांच्या धोरणात्मक संवादाची सशक्त भावना प्रकर्षाने दिसून आली.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाली. महान गायिका आशा भोसले यांच्या आकस्मिक निधनाबद्दल उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली तसेच त्यांच्या भारतीय संगीत आणि संस्कृतीतील अमूल्य योगदानाबद्दल आदर व्यक्त करत दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.

यानंतर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून युवकांना राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणा देण्यात आली. त्यानंतर अमित पुंडे, राज्य संचालक, माय भारत महाराष्ट्र व गोवा यांनी माय भारत संदर्भात मार्गदर्शनपर सत्र घेतले.

कार्यक्रमातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मधील ‘विकसित कृषी’ आणि ‘मानवी भांडवल विकास’ या महत्त्वपूर्ण विषयांवर आयोजित तज्ज्ञ पॅनेल चर्चा होय. या चर्चेत सचिन जाधव, अक्षय खोरगडे, गौरव गुप्ता, अमित गुप्ता, राजलक्ष्मी पाटील आणि विनय कुमार अवारे यांनी सहभाग घेतला. या सत्राचे प्रभावी संचालन संकेत कलांबे यांनी केले. युवकांनी उत्साहाने सहभाग घेत संवाद साधला.
याशिवाय, मनोज सानप, जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे यांनी युवकांना मार्गदर्शन करत त्यांना राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घेण्यास प्रेरित केले. त्यांनी सार्वजनिक धोरणांमध्ये सजग आणि माहितीपूर्ण सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमात केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री, भारत सरकार माननीय मनसुख मांडवीया यांचे आभासी मार्गदर्शन लाभले. त्यांनी देशाच्या विकासप्रक्रियेत युवकांच्या सक्रिय भूमिकेचे कौतुक केले. तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘पंचप्राण’ संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट करत युवकांनी विकसित भारत @2047 या ध्येयपूर्तीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
या उपक्रमाचे महत्त्व अधिक अधोरेखित करत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेशाद्वारे या कार्यक्रमातील व्यापक सहभाग आणि रचनात्मक संवादाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की अशा प्रकारचे मंच युवकांना धोरणनिर्मितीत सक्रिय योगदान देण्यास सक्षम करतात आणि भारताच्या विकासाच्या प्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तसेच सहभागी शासनव्यवस्थेला बळकटी देतात. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या प्रेरणादायी संदेशाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या दोन दिवसीय कार्यक्रमांतर्गत “नारी शक्ती : विकसित भारत की आवाज – समावेशक लोकशाही सशक्तीकरण” या विषयावर नारी शक्ती युवा संसद आयोजित करण्यात आली. यात 350 पेक्षा अधिक युवतींनी संसदीय पद्धतीने चर्चा करून विधिमंडळात महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या समर्थनार्थ ठराव मंजूर केला. या कार्यक्रमाला सुजाता पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच “संडेज ऑन सायकल” या रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. बी. डी. सोमाणी इंटरनॅशनल स्कूल ते सिडको फुटबॉल स्टेडियम या मार्गावर 350 हून अधिक युवकांनी सहभाग घेत पर्यावरण जागरूकता, तंदुरुस्ती आणि शाश्वत जीवनशैलीचा संदेश दिला.
एकूणच, माय भारत बजेट क्वेस्ट 2026 च्या अंतिम फेरीत 750 निवडक युवकांनी सहभाग घेतला. त्यांनी तज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांशी सक्रिय संवाद साधत विकसित भारत @2047 या संकल्पनेला बळकटी दिली आणि राष्ट्रनिर्मितीबाबतची आपली ऊर्जा, कल्पकता आणि बांधिलकी प्रदर्शित केली.




