
“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात
रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे स्व. शामराव पेजे सभागृहात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यशाळेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र गावडे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) तथा नोडल अधिकारी आरोग्यसंपन्न गाव समिती डॉ. विवेकानंद बिराजदार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा प्रशिक्षण पथक वैद्यकीय अधिकारी डॉ. शरण काठोळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये शासन निर्णयानुसार “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानाची उद्दिष्टे, अंमलबजावणीची कार्यपद्धती, विविध निकष, मूल्यांकन प्रक्रिया तसेच ग्रामस्तरावर आरोग्यदायी व सशक्त समुदाय निर्मितीसाठी आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच लोकसहभाग वाढविणे, आरोग्य सेवा सक्षम करणे आणि प्रत्येक गाव निरोगी, जागरूक व सक्षम बनविणे यावर विशेष भर देण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांनी या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून “प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त” हा उद्देश साध्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.




