
पालीच्या श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचा चैत्रोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
देश-विदेशातील भाविकांची मांदियाळी;
रत्नागिरी
तालुक्यातील पाली-पाथरटचे ग्रामदैवत आणि कोकणातील प्रसिद्ध श्रद्धास्थान असलेल्या श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचा वार्षिक चैत्रोत्सव सोहळा नुकताच अत्यंत चैतन्यमय आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त आयोजित विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी पाली नगरी दुमदुमून गेली होती. यंदा राज्यासह देश-विदेशातील हजारो भाविकांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शनाचा लाभ घेतला.
यंदाचा हा चैत्रोत्सव सोहळा चैत्र शुद्ध ११ ते चैत्र वद्य १ (२९ मार्च ते ३ एप्रिल) या कालावधीत पार पडला. उत्सवाचे यंदाचे सेवाकरी म्हणून अंबरनाथ येथील सतीश नवाथे कुटुंबीयांनी मान भूषवला. उत्सव काळात दररोज सकाळी वैयक्तिक पूजा, अभिषेक, एकादष्णी, लघुरुद्र, महारुद्र आणि यज्ञयागादी धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. दुपारी नैवेद्य, आरती व मंत्रपुष्पांजली, तर सायंकाळी धूपारती, नामजप, कीर्तन आणि पालखी प्रदक्षिणेचा सोहळा रंगला. छबिना आणि भजन मंडळांच्या भजनांनी मंदिराचा परिसर भक्तिमय झाला होता.
सांस्कृतिक कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद
उत्सवाचे खास आकर्षण ठरलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ह.भ.प. अमृता नवाथे (जावडे-लांजा) आणि ह.भ.प. विश्वनाथबुवा भाटे (उमरे-रत्नागिरी) यांची कीर्तने रंगली. निहाली गद्रे-ठाकूर (गोवा) यांनी सादर केलेल्या ‘स्वरनिहाली’ या अभंग आणि नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. तसेच श्री लक्ष्मीपल्लीनाथ नाट्यमंडळ, पाली निर्मित आणि अनिल काकडे लिखित ‘फायनल डिसीजन’ या नाटकाचा प्रयोगही यशस्वीरीत्या पार पडला. याशिवाय दीपोत्सव, वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि भजनांच्या कार्यक्रमांना भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष संतोष सावंतदेसाई, मानकरी गुरुराज सावंत, अनंत पालकर, प्रदीप घडशी, बबन काजरेकर, सुभाष गराटे, चंद्रकांत गुडेकर, विष्णू माईण, रोहित पांचाळ, अनिल धाडवे, गुरुदास धाडवे यांच्यासह पाली व पाथरटमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जीर्णोद्धार वर्धापनदिनाचे आवाहन
ग्रामदैवत श्री लक्ष्मीपल्लीनाथ आणि श्री करंबेळदेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचा १५ वा वर्धापनदिन सोहळा अनुक्रमे ३० एप्रिल आणि १ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. या आगामी कार्यक्रमांनाही सर्व भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष संतोष सावंतदेसाई यांनी केले आहे.




