
देशभरातील एलपीजी तुटवड्याबाबत मोठी बातमी : इंडियन ऑइल कंपनीने पुरवठ्याबाबत केले स्पष्टीकरण.
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिमाण देशभरातील घरगुती व व्यवसायिक एलपीजी गॅस सिलिंडर पुरवठ्यावर झाला आहे. दरम्यान देशातील अनेक भागात सिलिंडरसाठी लांबच- लांब लागलेल्या नागरिकांच्या रांगाही विविध समाज माध्यमातून पुढे येत आहे. दरम्यान या तुटवड्यासह पुरवठ्याबाबत इंडियन ऑइल कंपनीने महत्वाची माहिती दिली आहे.
जागतिक ऊर्जा बाजारावर चालू भौगोलिक-राजकीय परिस्थितीचा परिणाम होत असला, तरी भारतातील एलपीजी पुरवठा स्थिर, पुरेसा आणि सतत निरीक्षणाखाली आहे. घरगुती एलपीजीला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. इंडियन ऑइलकडून घरगुती एलपीजीचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. सध्या दररोज सुमारे २८ लाख गॅस सिलिंडर वितरित केले जात आहेत, जे भौगोलिक- राजकीय तणावापूर्वीच्या नेहमीच्या पातळीप्रमाणे आहेत. ग्राहकांनी गॅस रिफिल बुक करण्यासाठी भ्रमनध्वनीवर एसएमएस आणि आयव्हीआरएससारख्या डिजिटल पद्धतींचा वापर करावा, असे आवाहन इंडियन ऑइल कंपनीने केले आहे. सध्या सुमारे ८७ टक्के नोंदणी डिजिटल माध्यमातून होत आहेत.
तसेच सिलिंडर योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी ओटीपी) द्वारे गॅस वितरण केले जात आहे. इंडियन ऑइल सर्व ग्राहकांना सांगते की देशात एलपीजी पुरवठा पर्याप्त आणि सुरळीत आहे, कुठलाही तुटवडा नाही. ग्राहकांनी एलपीजी वितरकांच्या रांगा लावू नयेत आणि घाईघाईत बुकिंग किंवा सिलिंडर साठवू नयेत. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये आणि फक्त अधिकृत माहितीवर अवलंबून रहावे, असेही कंपनीने सांगितले.
समाज माध्यम प्लॅटफाॅर्मवरील तक्रारींवरही लक्ष
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आपल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आलेल्या ग्राहकांच्या तक्रारींवर लक्ष देत आहे आणि त्यांना त्वरीत उत्तर देण्यास कटिबद्ध आहे. इंडियनच्या ग्राहकांनी तत्काळ मदतीसाठी indanecareho@indianoil.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहनही कंपनीतर्फे केले गेले आहे.
आतापर्यंत ६८ हजार छापे
दरम्यान काही एलपीजी वितरकांच्या गैरप्रकारांबाबत सोशल मीडिया आणि ग्राहकांच्या तक्रारींमधून माहिती मिळाली आहे. काळा बाजार आणि साठेबाजी टाळण्यासाठी अनेक क्रॉस-फंक्शनल टीम्सना एलपीजी वितरकांकडे अचानक तपासणी करण्यासाठी पाठवले गेले आहे. आतापर्यंत ७ हजार ५०० पेक्षा जास्त तपासण्या करण्यात आल्या आहे. १४१ एलपीजी वितरकांविरुद्ध कारवाई केली गेली. त्यापैकी ५ वितरकांना निलंबित केले गेले. इंडियन ऑइल आणि इतर तेल विपणन कंपन्या राज्य सरकारांसोबत मिळून गैरप्रकार टाळण्यासाठी आणि साठेबाजी रोखण्यासाठी काम करत आहेत. आतापर्यंत सुमारे ६८ हजार छापे टाकले गेले, ८५५ एफआयआर नोंदवल्या गेल्या आणि ४८ हजारहून अधिक सिलिंडर जप्त केले गेले.




