रत्नागिरी जिल्हा परिषद विषय समिती सभापतींची नावे पालकमंत्र्यांनी केली जाहीर


रत्नागिरी जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या विषय समिती सभापतीपदांच्या निवडीचा सस्पेन्स अखेर संपला असून, पालकमंत्री उदय सामंत यांनी पाच महत्त्वाच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली असून, सर्व नियुक्त्या सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने या निवडीची प्रक्रिया बुधवार, दि. २५ मार्च रोजी पार पडणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. जिल्हा परिषदेच्या कामकाजात विषय समित्यांचे महत्त्व अधोरेखित मानले जाते. विविध योजनांची अंमलबजावणी, विभागनिहाय नियोजन आणि निर्णयप्रक्रियेत सभापतींची भूमिका निर्णायक असते. त्यामुळे या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
जाहीर करण्यात आलेल्या नावांनुसार, विलास चाळके यांची उपाध्यक्ष (बांधकाम व आरोग्य) म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच मयुरी मिलिंद शिर्के (महिला व बालकल्याण), महेश राघू नाटेकर (कृषी व पशुसंवर्धन), अॅड. सुयोग नंदकुमार कांबळे (समाजकल्याण) आणि नंदकुमार नारायण मुरकर (अर्थ व शिक्षण) यांची सभापतीपदी निवड निश्चित करण्यात आली आहे.

पक्षांतर्गत शिस्त राखत सर्वांना संधी मिळावी या उद्देशाने ‘सव्वा वर्षांचा’ कार्यकाळ निश्चित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार ही नाव निश्चिती करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले.

आगामी काळात ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, ही जबाबदारी नव्याने निवड झालेल्या सभापतींवर असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button