दिलेली भरपाई म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा’,आंबा-काजू बागायतदारांच्या मदतीसाठी राजू शेट्टी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर धडक देण्याचा इशारा!


राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्ग आणि कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद केली असताना, कोकणातील आंबा व काजू बागायतदारांच्या मदतीसाठी ५० कोटी रुपये देण्यासही हात आखडता घेतल्याचा आरोप करत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

यंदा आंब्याच्या नुकसानीपोटी प्रति झाड २२० रुपये भरपाई जाहीर करणे ही शेतकऱ्यांची थट्टाच असल्याचे सांगत, या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर धडक देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

देवगड – जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे आयोजित आंबा, काजू बागायतदार व व्यापारी महासंघ सिंधुदुर्गच्या ‘एल्गार मेळाव्यात’ शेट्टी बोलत होते. यावेळी रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने, काका ढोके, संजय गावडे, सुशांत नाईक, सुधीर जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

‘दिलेली भरपाई म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा’

राजू शेट्टी म्हणाले की, कोकणात एक मजूर दिवसाला ८०० रुपये मजुरी घेतो. अशा परिस्थितीत प्रति झाड २२० रुपये भरपाई देणे म्हणजे बागायतदारांची क्रूर थट्टा आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांनी एकजुटीने मुंबई गाठणे आवश्यक आहे. आंदोलनाची पुढील दिशा आणि मुंबई मोर्चाची तारीख येत्या शनिवारी रत्नागिरी येथे होणाऱ्या सभेत निश्चित केली जाईल.

आंबा बागायतदारांची पिळवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही शेट्टी यांनी कडक इशारा दिला आहे. “कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांकडून व्याजी रक्कम वसूल करू नका. तसेच इतर राज्यातील आंबा आणून त्यावर देवगड किंवा रत्नागिरीचा शिक्का मारून विक्री केल्यास, असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही,” असे ते म्हणाले. बागायतदारांच्या मालावर नजर ठेवण्यासाठी आता विशेष पथके नेमली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या मेळाव्यात माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले की, देवगडमधून सुरू झालेली ही चळवळ आता संपूर्ण कोकणात पसरली असून, रत्नागिरीतील शेवटच्या तालुक्यापर्यंत याला पाठिंबा मिळेल. कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनीही सरकारवर निशाणा साधत, पंचनामे न करताच तुटपुंजी मदत जाहीर केल्याबद्दल संताप व्यक्त केला.

या एल्गार मेळाव्याच्या निमित्ताने कोकणातील आंबा-काजू बागायतदार आता आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाले असून, आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button