
दापोली-खेड रस्ता बंद, जवळचा मार्ग असतानाही शोधला गेला लांबचा एसटी मार्ग
20 रूपयांचा प्रवाशांना भुर्दंड, उबाठाचा आंदोलनाचा इशारा
दापोलीः- दापोली-खेड या रस्त्याचे काम हॅम अंतर्गत सुरू असून या कामामध्ये संथगती मोठया प्रमाणात आहे. ऐन पावसाच्या तोंडावर दापोली शहरातील मशिदीजवळचा पुल तोडून नव्याने बांधला जाणार असून यामुळे खेडकडे जाणाऱ्या प्रवाशांना दापोली-पालगड-दस्तुरी असा प्रवास करावा लागणार आहे. यामुळे एसटी प्रवाशांच्या खिशाला सुमारे 20 रूपये अधिकचा भुर्दंड पडणार असून सार्वजनिक बांधकाम व एसटी विभागाने याबाबत योग्य तो मार्ग न काढल्यास आपण आंदोलन करू असा इशारा उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी दिला आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना श्री. गुजर म्हणाले की, दापोली खेड रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून मागील वर्षा ऐन पावसाळ्यात फुरूस व वाकवली येथे सार्वजनिक बांधकाम खात्याने जो गोंधळ घालून ठेवला होता त्यामुळे जनतेला नाहक त्रास दोन तीन महिने सहन करावा लागला होता. आता पुन्हा असाच त्रास शहरातील जनतेने सहन करावा असा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सुरू झाला असून पावसाळ्याच्या तोंडावर दापोली एसटी स्टॅण्ड जवळील उतारातील पुल तोडून पुढील तीन महिन्यात नव्याने बांधण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम खाते करणार आहे.
पावसाळ्यातच हा पुल पूर्ण होणार नसल्याने शहरवासियांना तीन महिने नव्हे तर किमान सहा महिने त्रास सहन करावा लागू शकतो असे आपल्याला वाटत आहे. त्यातच अवजड वाहनांचा विशेषतः एसटीचा प्रवास हा खेड कडे करताना दापोली-खेर्डी-पालगड-दस्तुरी असा केला जाणार असून यामुळे दापोलीतील प्रवाशांना 20 रूपयांचा जादाचा भुर्दंड सहन करावा लागणार असून टाळसुरे, नारगोली, कुंभवे, वाकवली, फुरूस, साखळोली येथील प्रवाशांना एसटीची वाहतुक मर्यादित स्वरूपाची मिळणार आहे. दापोलीतून खेडकडे जाताना पिसई-शिरशिंगे-वाकवली असा पर्यायी मार्ग उपलब्ध असताना पुढील वाढीव मार्ग कोणी शोधला असा सवालही श्री. गुजर यांनी उपस्थित केला असून हॅम अंतर्गत काम करणारे अभियंता हे स्थानिक सार्वजनिक बांधकाम खात्याला विश्वासात घेत नसल्याने असे प्रकार होत असून लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.
आपण जनतेला होणाऱ्या त्रासाबाबत तसेच प्रवाशांना बसणाऱ्या आर्थिक भुर्दंडाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व एसटी प्रशासन यांना निवेदन देणार असून त्यांनी तातडीने हा प्रश्न न सोडवल्यास जनतेला सोबत घेऊन आपण रस्त्यावर उतरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.




