“दादा”गिरी हवीहवीशी!

नारायण राणे. वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करतायत. वयानुसार शरीर थकले असले तरी नजरेतील दरारा अजूनही तसाच आहे…जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायणरावांना आमदार होण्यासाठी कणकवलीत पाठवले होते तेव्हा त्यांच्या नजरेत जो धाक, दरारा होता, तो दरारा आजही कायम आहे.

खरे तर नारायणराव…हे असे नारायणराव म्हटले की खूप लांबचे नाते वाटते…म्हणून मी इथे इतरांप्रमाणेच “दादा” या नावानेच संबोधणार आहे. तर दादांच्या राजकारणाबद्दल, कार्यशैलीबद्दल अनेकांचे आक्षेप असू शकतात, किंबहुना आहेतच…पण त्यांच्या सिंधुदुर्ग प्रेमाबद्दल कुणाचाच आक्षेप असू नये.

कणकवलीत (सिंधुदुर्ग) पत्रकारिता करताना त्यांचे राजकारण, समाजकारण जवळून पाहिले. वरवडे गावी येताना दादा सफेद ॲम्बेसेडर गाडीतून यायचे. पटवर्धन चौकात गाडी उभी करून त्यातून ते उतरायचे नाहीत, पण काळी काच खाली करून बसल्या बसल्या बाजारपेठेवरून एक नजर फिरवायचे…त्या नजरेतील तो दरारा आताही तसाच आहे…विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारा! विरोधी पक्षनेते असतानाही विधानसभागृहात ती करारी नजर आम्ही पत्रकारांनी टिपली होती आणि मुख्यमंत्री झाल्यावर एका सचिवाला त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसलेलेही आम्ही पाहिले होते.

सिंधुदुर्गचा हा सुपुत्र मुख्यमंत्री झाला तेव्हा, कोकणातील तुळशीचे रोप देतानाच्या प्रथेबद्दल आम्ही संपादकीय लिहिले होते. कोकणात कुणाला तुळशीचे रोप द्यायचे असेल तर तिच्या मुळाला घरची माती लावून देण्याची प्रथा आहे. कारण ती मातीच त्या तुळशीची नव्या घरात पाठराखण करणार असते. राणे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या पायालाही कोकणची लाल माती लागलेली आहे आणि मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर जाताना ती मातीच त्यांची पाठराखण करेल, असे आम्ही म्हटले होते. राणे यांनी तेव्हा ओरोस येथील सत्कार सोहळ्यात या अग्रलेखाचे जाहीर वाचन केले होते आणि मंत्रालयातील रेड कार्पेटवर आता फक्त कोकणच्या लाल मातीच्याच पाऊलखुणा दिसतील असे आश्वासनही दिले होते. केवळ त्यानंतरच नव्हे, तर आधी मंत्रिपदाच्या कार्यकाळातही राणे यांनी कोकण आणि खास करून सिंधुदुर्ग यांच्या विकासाचेच स्वप्न पाहिले आणि त्याचाच रोड मॅप तयार केला. कोकणात पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याचे श्रेय अर्थातच राणे यांचे. रस्ते, वीज आणि पाणी ही त्यांची विकासाची त्रिसूत्री. मात्र दरम्यानच्या प्रवासात त्यांच्यावर प्रॉपर्टी तयार करण्याचे आरोप झाले. राणे यांचे पेट्रोल पंप, बंगले हे राजकीय विरोधकांच्या सात बारावर होते, पण राणे हे राजकारणी असतानाच व्यावसायिकही आहेत, याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले होते.

दिवंगत केशवराव राणे (काँग्रेस) जेव्हा आमदार झाले तेव्हा त्यांनी एसटी वर्कशॉप हट्टाने कणकवलीत आणले होते. कारण त्यामुळे कणकवली बाजारपेठेत आर्थिक आवक जावक वाढणार हे त्यांना पुरते ठाऊक होते. एका वर्कशॉपमुळे तब्बल 900 कुटुंबे कणकवलीत आली आणि या छोट्या शहराचे अर्थकारणच बदलले.

नारायण राणे यांचे डेअरी कॉलेज, इंजिनियरिंग कॉलेज असो की पडवे येथील रुग्णालय असो, त्या गावातील, परिसरातील आर्थिक चळवळ वाढल्याचेच दिसून आले आहे. राजकारणात आरोप प्रत्यारोप होतच असतात. किंबहुना आरोप हे राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. राणे यांनाही त्या आरोपांचा सामना करावा लागला. राणे यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासात अशा आरोपांच्या अनेक फैरी झाडल्या गेल्या, पण तरीही राणे यांनी त्या आरोपांची आणि आरोप करणाऱ्यांची फिकीर केली नाही. आपली कार्यशैलीही बदलली नाही.
आजही त्यांची तीच “दादा”गिरी कायम आहे…खरे तर त्यांच्या राजकीय यशस्वितेचे तेच गमक आहे!

राणे कट्टर शिवसैनिक. मात्र राजकारण हा अनिश्चिततेचाच प्रवास असतो. दर दिवशी, दर क्षणाला काहीतरी घडत असते तेव्हाच कुठेतरी काहीतरी बिघडत असते. राणे यांचा गेल्या काही दशकातील राजकीय प्रवास असाच झेंडा बदलणारा ठरला. त्यामुळेही ते टीकाकारांच्या अधिक निशाण्यावर आले. त्यांनी मात्र त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले. राणे यांचा राजकीय प्रवास हा पाच दशकांचा. मात्र या पाच दशकांमुळेच राज्याच्या राजकारणात सिंधुदुर्गला स्वतःची स्वतंत्र ओळख मिळाली. सिंधुदुर्ग राणेंचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला.

नारायण राणे पंच्याहत्तरीत प्रवेश करतायत. त्यांना उदंड आरोग्यदायी आयुष्याच्या शुभेच्छा तर आहेतच, पण त्यांची “दादा”गिरीही हवीहवीशी वाटणारी आहे, हे मान्य करावेच लागेल. कारण प्रशासनावरील वचक, धाक यामुळे झालेली विकासकामे सिंधुदुर्गाने पाहिली आहेत. अनुभवली आहेत. राजकारणात निवृत्ती नसतेच. नारायण राणे यांनी कधीच निवृत्त होऊ नये. पुन्हा एकदा कणकवली नाक्यावर गाडी उभी करावी…आणि काच खाली करून…तीच करारी नजर पुन्हा एकदा कणकवलीच नव्हे, तर अवघ्या सिंधुदुर्गावरून फिरवावी…कारण कभी कभी दादागिरीही अच्छी लगती है!

∆रजनीश राणे
10.04.2026

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button