थिबा पॅलेस परिसरात बिबट्याचा वावर; सीसीटीव्हीत कैद, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

रत्नागिरी- रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस परिसरात बिबट्याचा वावर असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील रहिवासी रुपेश रघुनाथ सावंत यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये बिबट्या दिसून आला असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

सावंत कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून हा बिबट्या या परिसरात वावरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. परिसरातील अनेक भटक्या कुत्र्यांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, याबाबत ठोस पुरावा नव्हता. आता सीसीटीव्ही फुटेजमुळे बिबट्याच्या उपस्थितीला दुजोरा मिळाला आहे.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी उद्यम नगर परिसरातही बिबट्याने दोन बकऱ्यांचा बळी घेतल्याची घटना घडली होती. त्यामुळे थिबा पॅलेससह आसपासच्या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वन विभागाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी सावंत कुटुंबियांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button