
तहसीलदार बदनामीप्रकरणी माजी जि.प. सदस्य परशुराम कदम यांच्यावर गुन्हा
रत्नागिरी जि. प. माजी सदस्य परशुराम कदम याने समाज माध्यमावर व्हिडीओ प्रसारित करुन लोकांमध्ये आपल्याविषयी संभ्रम निर्माण केला तसेच आपली बदनामी केली अशी तक्रार तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडून रत्नागिरी ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी परशुराम कदम यांच्याविरुद्ध बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
म्हात्रे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार परशुराम कदम यांनी स्वतःचे सोशल मिडीयावर व्हीडीओ प्रसारित केला होता. ज्यामध्ये तहसीलदार कार्यालय येथे एका महिलेने धान्य लाभ मिळणेकरीता अर्ज सादर केला होता. हे काम २ वर्ष काम प्रलंबित होते. आपण स्वतः तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना भेटून हे काम करण्यास सांगितले होते. त्यानंतर अर्जानुसार काम झाले. तरी भविष्यात कोणाचे काम अडले असेल तर मला संपर्क साधा, असे बोलताना कदम दिसतात. या व्हिडीओमुळे तहसीलदार या पदावर काम करीत असताना लोकांमध्ये आपल्या कामाविषयी संभ्रम निर्माण करून, माझी प्रतिमा खराब केली व माझ्या लौकीकास बाधा आणून माझी मानहानी केलेली आहे, अशी तक्रार म्हात्रे यांनी ग्रामीण पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी कदम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५६ (२) नकार बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला.
www.konkantoday.com




