
जैन मुनींच्या वक्तव्याविरोधात दापोलीतील मराठा महिला संघाचा तीव्र निषेध
तहसीलदारांना निवेदन
दापोली : काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये एका जैन मुनीने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, या वक्तव्याचा मराठा महिला संघ दापोली, रत्नागिरी यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. या संदर्भात मंचाच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित जैन मुनीने छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी व स्वराज्य रक्षिका महाराणी ताराराणी यांच्याबाबत अत्यंत चुकीचे व बिनबुडाचे विधान केले आहे. हे विधान केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात आले असून, यामुळे छत्रपतींच्या महान घराण्याचा व संपूर्ण मराठा समाजाचा अपमान झाला असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
इतिहासातील उपलब्ध नोंदी, विविध संशोधन आणि इतिहासकारांच्या लेखनानुसार महाराणी ताराराणी या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून होत्या. त्यांनी अत्यंत धैर्याने आणि शौर्याने औरंगजेबाविरुद्ध लढा देत स्वराज्य टिकवून ठेवले. अशा शूर व कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाबाबत चुकीची माहिती प्रसारित करणे म्हणजे इतिहासाची पायमल्ली करण्यासारखे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोणत्याही व्यक्तीला छत्रपतींच्या घराण्याबद्दल किंवा ऐतिहासिक व्यक्तींबद्दल चुकीची माहिती प्रसारित करण्याचा अधिकार नाही. संबंधित जैन मुनीने केलेल्या या नादान वक्तव्याबद्दल संपूर्ण मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.
तसेच संबंधित जैन मुनीने त्वरित आपले वक्तव्य मागे घेऊन संपूर्ण समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. अन्यथा भविष्यात अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर भारती शिंदे, ज्योती जाधव, प्रज्ञा पाटील, निशा सावंत, उल्का जाधव, सुविधा जाधव, मराठा संघाच्या महिला प्रतिनिधींच्या स्वाक्षरी असून, हे निवेदन दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांना देण्यात आले आहे.




