
जेएनपीए बंदराला जोडणारा पूल खचला अपघाताच्या शक्यतेमुळे वाहतूक बंद!
जेएनपीएच्या चौथ्या सिंगापूर (बीएमसीटी) या बंदराला जोडणारा पूल जसखारजवळ खचला आहे. त्यामुळे सुरक्षा म्हणून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.आठ वर्षापूर्वी ६८ कोटी खर्च करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा पूल उभारला आहे. या पुलावरून दररोज हजारो अवजड कंटेनर वाहनांची वाहतूक होते.
आयात-निर्यात प्रक्रियेला गती देण्यासाठी तसेच वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या जेएनपीएच्या चौथ्या बंदराला जोडणाऱ्या उड्डाणपुलाजवळील मार्गाचा काही भाग अचानक खचल्यामुळे या पुलाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा पूल जसखार गावाला वळसा घालत थेट चौथ्या बंदराला जोडण्यासाठी उभारण्यात आला आहे. सध्या तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आला आहे.
या पुलाच्या बांधकामाला सुरुवातीपासूनच वादाची किनार लाभली होती. या पुलाच्या कामामुळे जसखार गावातील श्रद्धास्थान असलेल्या श्री रत्नेश्वरी देवी मंदिराला तडे गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. आता पुलाचा भाग खचल्याने पुलाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत असून, संबंधित यंत्रणांवर टीकेची झोड उठू लागली आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
कामाची तपासणी आवश्यक
काही दिवसांनी रत्नेश्वरी देवीचा जत्रोत्सव होणार आहे. त्यामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ अपेक्षित आहे. तसेच पुलालगत तयार करण्यात आलेल्या उद्यानामुळेही येथे नागरिकांची गर्दी वाढत आहे. अशा परिस्थितीत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेत तातडीने दुरुस्ती सुरू केली असली तरी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कामाच्या गुणवत्तेची काटेकोर तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.




