
जिल्हा परिषदेत स्थायी व विविध विषय समिती सदस्य निवडणुकीसाठी सत्ता-समीकरणांची चढाओढ
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून मंगळवार, दि. ७ एप्रिल रोजी होणार्या स्थायी व विविध विषय समिती सदस्य निवड प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही निवड केवळ औपचारिक न राहाता सत्ताधारी आणि विरोधकांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
यंदाची निवड प्रक्रिया प्रशासनाच्या कडक मार्गदर्शक तत्त्वांनुसार होणार आहे. ’एक सदस्य, एक समिती’ हा महत्त्वाचा नियम लागू करण्यात आल्याने प्रत्येक सदस्याला किमान एका समितीवर स्थान मिळणे बंधनकारक ठरणार आहे. त्यामुळे आतापर्यंत गटतटांच्या राजकारणात मागे पडलेल्या सदस्यांनाही यावेळी संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्थायी समिती ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची मानली जाते. या समितीत
अध्यक्ष आणि विविध विषय समित्यांचे सभापती यांच्यासह एकूण आठ सदस्यांची निवड केली जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती तसेच मागास प्रवर्गासाठी राखीव जागांमुळे निवड प्रक्रियेतील गणिते अधिक गुंतागुंतीची बनली आहेत.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही यंदाची निवड प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीत किमान तीन महिला सदस्य असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर समाजकल्याण समितीत मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती-जमाती व मागास प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेषतः महिला व बालकल्यापण समितीत ७० टक्के म्हणजेच ८ पैकी जागा महिलांसाठी राखीव असल्याने महिला सदस्यांचे सभागृहातील महत्त्व लक्षणीय वाढणार आहे.
www.konkantoday.com




