जगबुडी नदीच्या पुलावर पुन्हा केमिकल टँकर पलटी


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणे येथील जगबुडी पुलाजवळ आज रसायन वाहतूक करणारा टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटल्याची घटना घडली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आहे.
जगबुडी नदी पुलावर शनिवारी (4 एप्रिल) दुपारी सुमारे सव्वा एक वाजेच्या सुमारास केमिकल टँकरचा भीषण अपघात झाला. मुंबईहून लोटे एमआयडीसीकडे निघालेला हा टँकर अचानक पलटी झाल्याने टँकरमधील इथेनॉल नदीपात्रातील पाण्यात मिसळू लागल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे परिसरात पर्यावरणीय धोक्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सदर टँकर लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीसाठी केमिकल घेऊन जात होता. अपघातात टँकर चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तत्काळ उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतरचे व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत अपघातग्रस्त टँकरमधील इथेनॉल जगबुडी नदीत पडत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घातक केमिकलमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच भरणे नाका येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पाटणे आणि त्यांच्या मित्र परिवाराने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच खेड पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच कंपनीचा केमिकल घेऊन जाणारा टँकर भोस्ते घाटात पलटी झाल्याची घटना घडली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button