
चिपळूणमध्ये ११ एप्रिल रोजी सकल हिंदू संमेलन; विविध कार्यक्रमांचे आयोजन
चिपळूण : शहरातील कावीळतळी, शंकरवाडी, मार्कंडी, परशुराम नगर आदी परिसरातील बांधवांचे पहिले सकल हिंदू संमेलन ११ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन चिपळूणमधील बांदल हायस्कूलच्या सभागृहात होणार आहे.
या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात वस्तीनिहाय संमेलनांचेही आयोजन करण्यात आले आहे. रावतळे वस्ती येथे ७ एप्रिल रोजी श्री विंध्यावासिनी माता मंदिरात, तर माधवबाग-कालभैरव मंदिर-चिंचनाका-मुरादपूर वस्ती येथे १२ एप्रिल रोजी इंदिरा गांधी केंद्रासमोर वेस मारुतीजवळ कार्यक्रम होणार आहे. खेंड वस्ती येथे १३ एप्रिल रोजी श्री गोपाळकृष्ण मंदिर, हवेली येथे तसेच पाग-बुरुमतळी वस्ती येथे २६ एप्रिल रोजी कैलास भवन, पाग येथे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
हिंदू धर्म व संस्कृतीचे संरक्षण तसेच समाज संघटन या उद्देशाने या संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य संमेलनात सायंकाळी ४.३० पासून महाराष्ट्र गीत, हरिपाठ, पोवाडा, लोककला कार्यक्रम आणि ‘पंच परिवर्तन’ यांसारखे विविध प्रेरणादायी कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. या प्रसंगी हिंदू जागरण मंचचे ॲड. अमेय मालशे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कावीळतळी, शंकरवाडी, मार्कंडी, परशुराम नगर आदी भागातील बांधव प्रयत्नशील असून, जास्तीत जास्त नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू संमेलन समितीचे अध्यक्ष गजानन लोकरे यांनी केले आहे.




