
घराकडे जाण्यास रस्ता नसल्याने संतप्त तरुणाने रोखला मुंबई-गोवा महामार्ग

खेड : घराकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्यामुळे संतप्त झालेल्या एका तरुणाने थेट मुंबई-गोवा महामार्ग रोखल्याची घटना गुरुवारी सायंकाळी वेरळ येथे घडली. या प्रकारामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, वेरळ येथील हॉटेल गणपती कृपा जवळील परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता अचानक महामार्गावर येत वाहतूक अडवली. यामुळे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी झाली. घटनास्थळी उपस्थित वाहनचालकांनी संबंधित तरुणाला महामार्ग रोखण्यामागील कारण विचारले असता, त्याने ठेकेदाराकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या आश्वासनांना कंटाळून हा मार्ग अवलंबल्याचे सांगितले.
महामार्गाच्या कामामुळे स्थानिकांना घराकडे जाण्यासाठी कोणताही सुरक्षित आणि योग्य रस्ता उपलब्ध नसल्याची समस्या त्याने मांडली. विशेषतः तोंडावर पावसाळा येत असताना ही समस्या अधिक गंभीर बनत असल्याचे त्याने स्पष्ट केले. अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने अखेर संतप्त होऊन महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतल्याचेही त्याने सांगितले.
या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित यंत्रणांनी तातडीने याची दखल घेऊन समस्या सोडविण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.




