गुहागरमध्ये कासव महोत्सवाला सुरूवात, पर्यटकांनी आनंद घेण्याचे आवाहन


गुहागर नगरपंचायत व कांदळवन विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने १ एप्रिलपासून गुहागर समुद्रकिनारी कासव महोत्सवाला सुरूवात करण्यात आली आहे. नगराध्यक्षा व नगरपंचायत प्रशासन यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला असून कासव महोत्सवातून पर्यटकांनी गुहागर पर्यटनाचा आनंद लुटावा, असे आवाहन मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी केले आहे गुहागर नगरपंचायतीने प्रथमच कासव महोत्सवाचा उपक्रम राबविला आहे.
गुहागर समुद्रकिनारा ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी चिविध उपक्रम सुरू असून या महोत्सवामुळे आणखीनच जमेची बाजू ठरली आहे. गेली पंधरा वर्षे गुहागर समुद्रकिनार्‍यावर कासव संवर्धनाची मोहीम सुरू आहे. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यांपेक्षा गुहागर समुद्रकिनार्‍यावर सर्वाधिक कासवांचे संवर्धन करून समुद्रामध्ये सोडण्यात आले. या अगोदर वनविभागाने कासव महोत्सव भरविण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, नगराध्यक्षा सौ. नीता मालप व सर्व नगरसेवक, नगरसेविका यांच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी कासव महोत्सव भरविण्यात आला आहे. पिंपळादेव हॅचरी क्रमांक २ याठिकाणी याची सुरूवात करण्यात आली. हॅचरीचे उदघाटन नगराध्यक्षा सौ. नीता मालप यांच्या हस्ते करून मुख्याधिकारी यांनी या कासव महोत्सवाची संपूर्ण माहिती दिली.
गुहागर समुद्रचौपाटीवर यावर्षी १८४ घरती मिळून आली असून कासव महोत्सवाच्या शुभारंभावेळी २६ कासव पिल्ले समुद्रामध्ये सोडण्यात आली. नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे गुहागर शहरातील ग्रामस्थ, पर्यटक, गुहागर नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक यांनी प्रथमच या कासव महोत्सवामध्ये सहभाग घेत कासव संवर्धन ते जन्मजात कासवे समुद्रामध्ये सोडण्यापर्यंतचा आनंदाचा क्षण अनुभवला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button