
खेड तालुक्यातील मेटे मोहल्ला परिसरात जुन्या वादातून मारहाण केल्याने ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
खेड तालुक्यातील मेटे मोहल्ला परिसरात जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत ५५ वर्षीय शफी अब्दुल्ला वरवटकर यांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५:३० वाजण्याच्या सुमारास मेटे मोहल्ल्यातील कब्रस्तानाजवळील रस्त्यावर घडली.
याप्रकरणी शेखअली हसन वरवटकर (वय ४४, रा. मेटे मोहल्ला, पोस्ट असगणी, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम १०३ (१), ३५१(३), ३५२, ३(५) अन्वये नोंदविण्यात आला.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, मृत शफी वरवटकर हे फिर्यादीचे सख्खे चुलत भाऊ असून आरोपी अशरफ महामुद बोट, गणी इस्माईल बोट आणि कादिर शमशुद्दीन घारे (सर्व रा. मेटे मोहल्ला, ता. खेड) यांनी जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून त्यांच्यावर हल्ला केला. संबंधित आरोपींनी प्रथम शिवीगाळ करून त्यानंतर हाताने व लाथाबुक्यांनी वारंवार मारहाण केली.
महत्त्वाचे म्हणजे, शफी वरवटकर यांचे यापूर्वी हृदयाचे बायपास ऑपरेशन झाले असल्याची माहिती आरोपींना असूनही त्यांनी छातीवर वारंवार प्रहार करत जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शफी वरवटकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे मेटे मोहल्ला परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे




