
खेडमध्ये ५ गावे पाणीटंचाईग्रस्त
टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज
खेड : तालुक्यात कडक उन्हाळ्यामुळे जमिनीमधील पाण्याची पातळी कमी झाल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. तालुक्यातील पाच गावांनी टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केला आहे.
एप्रिल महिन्याची सुरुवात झाली असून, उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. त्यामुळे पाण्याची पातळी घटत चालली खेड तालुक्यातील पाच गावांना पाणी टंचाईची झळ पोचली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी कमतरता भासू लागल्याने घेरा रसाळगड गावातील भराडे, धनगर वाडी, तांबटवाडी, बौद्धवाडी, पेठवाडी, धनगरवाडी, निमणी धनगरवाडी या वाड्यांनी पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज सादर केलेले असतानाच कासई बोरवाडी, खवटी खालची व वरची धनगरवाडी, हुंबरी म्हाळुंगे धनगरवाडी या दोन गावांमधील ग्रामस्थांनीही टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन आता प्रशासन कधीपासून टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आमदार तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यामध्ये विशेष लक्ष देऊन टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबतचे आदेश प्रशासनाला द्यावेत, अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त होत आहे.




