
खेडमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का; तालुका प्रमुखांसह शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश
दत्ताराम भिलारे यांच्यासह कार्यकर्त्यांचा रामदास कदम, योगेश कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे
खेड : उत्तर रत्नागिरीत राजकीय घडामोडींना वेग आला असून खेड तालुक्यात उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. खेड तालुक्यातील उबाठा गटाचे तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात अधिकृत पक्षप्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना नेते रामदास कदम तसेच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी भिलारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश करत आपला जाहीर पाठिंबा दर्शवला.
खेड तालुक्यातील भिलारे आयनी तसेच सखरोळी गावातील उबाठा गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते संजय कदम, जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, नगराध्यक्षा माधवी बुटाला यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून उबाठा गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.




