कोल्हापूर, सावंतवाडी गाड्या बंद करुन ‘गोरखपूर स्पेशल’ला प्राधान्य; रेल्वे प्रवासी रस्त्यावर उतरणार


राज्यातील विशेषतः कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील रेल्वेफेऱ्या आणि अन्य प्रश्नांकडे केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे.याचा निषेध करण्यासाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने 1 मे रोजी मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेवर कमी विशेष गाड्या चालवणे, उत्तर भारताला प्राधान्य देणे अशा निर्णयांमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याबाबत करी रोड येथील भिरवंडेकर सावंत मराठा समाज कार्यालयात नुकतीच कार्यकारिणी सभा पार पडली. या मुद्द्यावरून महाराष्ट्र दिनी मोर्चा काढण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. ‘महाराष्ट्राबाबत रेल्वेचा दुजाभाव’ आहे का? आणि असेल तर का? असा सवाल विचारला जातोय.

विशेष फेऱ्यांची संख्या तोडकी

कोकाणासह राज्यात नियमित आणि विशेष फेऱ्यांचीही संख्या तोकडी आहे. कोल्हापूर-चंदगड-बेळगाव, सावंतवाडी-चंदगड-बेळगाव आणि वैभववाडी-कोल्हापूर या प्रलंबित
रेल्वेमागांकडे दुर्लक्ष होत आहे. सावंतवाडी टर्मिनल अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कशामुळे कमी झाली संख्या?

मार्च महिन्यात रेल्वे मंत्रालयाने लागू केलेल्या ‘झिरो बेस्ड टाइमटेबल’ धोरणामुळे राज्यांतर्गत अनेक महत्त्वाच्या गाड्या बंद किंवा आंशिक रद्द करण्यात आल्या आहेत. तर उत्तर भारताकडे म्हणजेच उत्तर प्रदेश बिहार, गोरखपूर इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवण्यात आली. यामुळे कोकण, मराठवाडा आणि इतर भागातील प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

नव्या वेळापत्रकामुळे बंद पडलेल्या गाड्या कोणत्या?

मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, पुणे-नाशिक-भुसावळ एक्सप्रेस, दादर-रत्नागिरी पॅसेंजर, गोदावरी एक्सप्रेस, रत्नागिरी पॅसेंजर, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, पनवेल-बारामती पॅसेंजर अशा एकूण २५ हून अधिक गाड्या किंवा त्यांचे काही टप्पे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.

वाढवण्यात आलेल्या गाड्या कोणत्या?

दादर-गोरखपूर, मुंबई-उत्तर भारताकडे अतिरिक्त विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाने या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कमी प्रवासी संख्या आणि संसाधनांचा इष्टतम वापर यासाठी काही रेल्वे गाड्या बंद केल्या आहेत, असं रेल्वेने म्हटलं आहे. तसेच शून्य आधारित वेळापत्रक म्हणजे प्रत्येक गाडीची नव्याने तपासणी करून फक्त गरजेनुसार चालवण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे.

रेल्वे प्रश्नांवर एकत्रित लढा उभारण्याचा निर्धार

माध्यमातून कोकणासह राज्यातील सर्वच भागांतील रेल्वे समस्या एका छताखाली मांडणे आणि त्या पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुरावा करणे यासाठी दादर येथे राज्यस्तरीय रेल्वे परिषद घेण्याचा निर्णय झाला आहे. विविध जिल्ह्यांतील प्रवासी प्रतिनिधींना यासाठी आमंत्रित करण्यात येईल. राज्यातील रेल्वे प्रश्नांवर एकत्रित लढा उभारण्याचा निर्धार समितीच्या सभेत घेण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button