
कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनमार्फत गाव पातळीवर कर्करोगाची होणार रुग्ण तपासणी
८ एप्रिल ते ११ मे दरम्यान रुग्ण तपासणी, प्राथमिक उपचार व संदर्भ सेवा देणार
रत्नागिरी : वाढत्या कर्करोगाचे प्रमाण कमी करणे व जास्तीत जास्त लोकांची तपासणी करुन त्यांना वेळीच उपचार आणि संदर्भ सेवा देण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ८ एप्रिल ते ११ मे एक महिन्याच्या कालावधीत कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनमार्फत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गाव पातळीवर कर्करोगासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण तपासणी प्राथमिक उपचार व संदर्भ सेवा दिली जाणार आहे. या वाहनामध्ये मुखाचा, स्तनाचा व गर्भाशय मुखाचा कर्करोग आदींची तपासणी दंतशल्य चिकित्सक व स्त्रीरोग तज्ञ विशेषज्ञांमार्फत मोफत करण्यात येणार आहे.
असंसर्गजन्य आजारांची झपाटयाने वाढ होत असून जवळपास ६३ टक्के मृत्यू हे असंसर्गजन्य रोगामुळे होतात. त्यापैकी कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ९ टक्के आहे. ग्लोबोकॅन २०२० च्या सर्वेक्षणानुसार कर्करोगाचे १३ लक्ष २४ हजार रुग्ण आढळून आले आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या विचार केल्यास मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा मुख कर्करोग हे तीन सर्वात जास्त आढळणारे कर्करोग आहेत. आजच्या काळातील बदलती जीवनशैली व सवयी यांमुळे कर्करोग रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या वाढत्या रोगाचा विळखा कमी करण्यासाठी ही व्हॅन पुढील एक महिना जिल्ह्यातील गावांत फिरणार आहे.
कॅन्सर व्हॅन फिरतीचा कार्यक्रम असा असेल : ८ एप्रिल ते ११ एप्रिल संगमेश्वर, १३ ते १६ एप्रिल चिपळूण, १७ ते २० एप्रिल खेड, २१ ते २२ एप्रिल मंडणगड, २३ ते २५ एप्रिल दापोली, २७ ते २९ एप्रिल गुहागर, ३० एप्रिल ते ४ मे रत्नागिरी, ५ मे ते ७ मे लांजा आणि ८ ते ११ मे राजापूर.
जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी कॅन्सर व्हॅनमार्फत देण्यात येणाऱ्या सेवासुविधांचा मोठ्या प्रमाणावर उपभोग घेऊन आपली तपासणी करून घ्यावी. अधिक माहितीसाठी जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये भेट देऊन चौकशी करावी. कर्करोगविषयक आरोग्य सल्ला मिळविण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०४ वर कॉल करून माहिती घ्यावी,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.




