आंबोली घाटात अपघात, ट्रकच्या धडकेत दुचाकीचा चुराडा, बापाच्या डोळ्यासमोर लेकीचा मृत्यू


आंबोली घाटात काल एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका आयशर ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत ११ वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला.तर तिचे आई-वडील आणि बहीण जखमी झाले आहेत. या प्रकरणी ट्रक चालकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबोलीतील प्रसाद गोविंद राऊत हे आपल्या कुटुंबासह सुझुकी ॲक्सेस गाडीने आंबोलीकडून सावंतवाडीच्या दिशेने जात होते. दुचाकी नानापाणी परिसरातील एका वळणावर आली असता, मागून येणाऱ्या आयशर ट्रकने (क्र. GJ 03 BW 9027) त्यांना जोरदार धडक दिली.

या ट्रकमध्ये फरशा (टाईल्स) आणि मार्बलचा जड माल भरलेला होता. ट्रक चालक प्रकाश बिजलबाई टोयटा (वय २६, रा. राजकोट, गुजरात) याने वळणावर गाडीचा वेग कमी न करता निष्काळजीपणे वाहन चालवल्याने हा अपघात घडला. या भीषण धडकेत कुमारी निकिता प्रसाद राऊत (वय ११) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिची आई सुचिता राऊत, वडील प्रसाद राऊत आणि सहा वर्षांची बहीण निधी राऊत हे या अपघातात जखमी झाले आहेत. दुचाकीला धडक दिल्यानंतरही ट्रकचा वेग इतका प्रचंड होता की, चालक गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही. घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर एका वळणावर हा ट्रक बाजूच्या दगडावर आदळून पलटी झाला.या अपघातामध्ये चालक प्रकाश टोयटा आणि क्लिनर विशाल टोयटा हे दोघेही जखमी झाले. अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button